Covid 19 Vaccine - सीरमच्या लशीला तज्ज्ञांचा हिरवा कंदील; परवानगीसाठी DGCI कडे शिफारस

टीम ई सकाळ
Friday, 1 January 2021

भारतात कोरोना व्हॅक्सिनबाबत तज्ज्ञांच्या कमिटीची महत्त्वाची बैठक सुरू आहे. यामध्ये ऑक्सफर्ड एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनला आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी मंजुरी देण्याबाबत चर्चा होत आहे.

नवी दिल्ली - भारतात कोरोना लस मिळण्याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सीरमच्या कोविशिल्ड लशीच्या वापरासाठी ना हरकत प्रमाणपत्र तज्ज्ञांच्या समितीने दिलं आहे. आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याबाबतची शिफारस तज्ज्ञांनी डीजीसीआयकडे केली आहे. कोविशिल्डच्या वापराला काही अटींसह वापर करण्यासाठी परवानगी देता येईल असं समितीने म्हटलं आहे. 

तज्ज्ञांच्या समितीने शिफारस दिल्यानंतर औषध नियंत्रण महासंचालकांकडून परवानगी आवश्यक आहे. तसंच सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची परवानगीही गरजेची आहे. त्यानंतर भारतात कोरोना लशीच्या वापरासाठी मार्ग मोकळा होईल.  

सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली आहे. तसंच लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्यात 10 कोटींपर्यंत डोस तयार होतील अशी माहितीसुद्धा सीरमच्यावतीने देण्यात आली.  

देशभरात 2 जानेवारीला कोरोना लशीच्या लसीकरणाची रंगित तालीम होणार आहे. याबाबतची माहिती देशाचे आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus live update covid 19 oxford vaccine serum approval india expert meeting

Tags
टॉपिकस
Topic Tags: