दुसरी लाट ओसरली; तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्णवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसरी लाट ओसरली; तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्णवाढ

दुसरी लाट ओसरली; तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्णवाढ

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सोमवारी देशात 42 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 91 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णवाढ आहे. जवळपास तीन महिन्यानंतर देशातील रुग्णसंख्या 50 हजारांच्या खाली आली आहे. सोमवारी देशात 81 हजार 410 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान एक हजार 162 जणांचा मृत्यू झाला आहे.

तीन महिन्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची वाढ 50 हजारांच्या खाली आली आहे. याआधी 23 मार्च 2021 रोजी 47 हजार 239 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते. मागील 24 तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही 40 हजारांची घट झाली आहे. देशातील उपचाराधानी रुग्णसंख्या सात लाखांच्या खाली आली आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण कोरोना रुग्ण (Total cases) : 2,99,77,861

एकूण कोरोनामुक्त (Total discharges) : 2,89,26,038

एकूण मृत्यू (Death toll) : 3,89,302

एकूण उपचाराधीन रुग्ण (Active cases) : 6,62,521

एकूण लसीकरण (Total Vaccination) : 28,87,66,201

देशात लसीकरणाचा विक्रम -

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील लसीकरणाचा वेग वाढविला आहे. देशात नवे लसीकरण नियम लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 85 लाखांपेक्षाही अधिक लोकांनी लस घेत नवा विक्रम प्रस्थापित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याचे कौतुक करताना ‘वेल डन इंडिया’ अशा भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या आहेत. ‘‘ कोरोनाविरोधातील लढाईमध्ये लसीकरण हेच सर्वांत प्रभावी शस्त्र असून लस घेणाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत. सर्व नागरिकांना लस मिळावी म्हणून फ्रंटलाईन वर्कर खूप मेहनत घेत आहेत.’’ अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या. केंद्र सरकारने अठरा वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करायला सुरुवात केल्याने या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढली आहे. सोमवारी एकाच दिवशी 85,15,765 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

loading image
go to top