covid-19: भारताने ब्राझीलला टाकले मागे; आता फक्त अमेरिका आपल्या पुढे

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 September 2020

कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकले आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणाऱ्यांच्या संख्येत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.

नवी दिल्ली- कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकले आहे. जगात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असणाऱ्यांच्या संख्येत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आतापर्यंत भारतात ४१ लाख १३ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलमध्ये ४० लाख ४१ हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे. अमेरिकेत ६० लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा! कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोक उतरले...

भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात ८० हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. दुसरीकडे अमेरिकेत दररोज ४० ते ५० हजार कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीचा दर कायम राहिल्यास पुढील काही आठवड्यात भारत अमेरिकेलाही मागे टाकण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून एका दिवसात ७५ हजारांच्या पुढे रुग्ण सापडणारा भारत एकमेव देश ठरला आहे. शुक्रवारी कोरोनाग्रस्तांची भारतात एका दिवसातील विक्रमी वाढ झाली. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात ९० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत.  भारताची रुग्ण संख्या आटोक्यात न येता दिवसेंदिवस विक्रम प्रस्थापित करत असल्याने चिंता वाढली आहे.

ब्राझीलमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारी आटोक्यात आल्याचं दिसत आहे. देशात याआधी दिवसाला जवळपास ४० हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडायचे, पण आता हा आकडा अर्ध्यावर आला आहे. गेल्या काही दिवसात ब्राझीलमध्ये २० हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण सापडत आहेत. अमेरिकेमध्येही तुलनेने कमी रुग्ण संख्या नोंद होत आहे.

'मोदी सरकारच्या गब्बर टॅक्समुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला...

देशात कोरोना चाचण्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत, त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. ऑगस्ट महिन्यापासून भारताने कोरोना चाचणी घेणे मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला देशात ४ ते ५ लाख चाचण्या होत होत्या, सध्या भारतात दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. चाचण्या घेण्यामध्ये अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो.

मागील केवळ १३ दिवसांत तब्बल १० लाखांनी रुग्णसंख्या वाढणे हा चिंतेचा विषय असतानाच मृत्यूदर घटून १.७३ झाल्याचे केंद्रीय आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. देशात या वर्षाअखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच कोरोना लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असे केंद्राचे मत आहे. तज्ज्ञांच्या मते, देशात कोरोनाच्या सामूहिक उद्रेकाला (कम्युनिटी स्प्रेड) ऑगस्टपासूनच सुरवात झालेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या दाव्यानुसार शनिवार सकाळपर्यंत ३१ लाख ७ हजार २२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ७७.२३ पर्यंत वाढले आहे. रुग्णांची संख्या १० लाखांहून २० लाखांपेक्षा जास्त होण्यास केवळ २१ दिवसांचा काळ लागला आहे.

(edited by- kartik puajri)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus update India is now ahead of Brazil