esakal | देशात कोरोनाबाधितांची संख्या 31 लाखांवर; सीरमच्या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

covid vaccine

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतात मंगळवारपासून ऑक्सफर्ड य़ुनिव्हर्सिटी आणि अस्ट्राजेनिकाने तयार केलेल्या कोरोना व्हायरस व्हॅक्सिन कोविशील्डची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार आहे. 

देशात कोरोनाबाधितांची संख्या 31 लाखांवर; सीरमच्या लशीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या आठवड्याभरात रुग्णांची संख्या दरदिवशी 60 ते 70 हजारांनी वाढत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 31 लाखांच्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे 31 लाख 6 हजार 349 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 23 लाख 38 हजार 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या 7 लाख 10 हजार 771 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 57 हजार 542 इतका झाला आहे. तर आतापर्यंत देशात 3.5 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने म्हटलं की, कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट अशा रणनितीवर काम करत आहे.

महाराष्ट्रात सोमवारी एका दिवसात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 14 हजार 219 होती. नवीन रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी दिवसभरात 11 हजार 15 नवे रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 93 हजार 398 इतकी झाली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 22 हजार 465 वर पोहोचला आहे. सोमवारी दिवसभरात 212 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

हे वाचा - प्लाझ्मा थेरेपीला अमेरिकेत मान्यता ; आपत्कालीन परिस्थितीत वापर होणार

मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या सोमवारी इतर दिवसांच्या तुलनेत कमी झाली असून 743 रुग्ण सापडले. मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,37,091 झाली आहे. तर सोमवारी 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 7,439 वर पोचला आहे. मुंबईत दिवसभरात 1,025 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असताना भारतात मंगळवारपासून ऑक्सफर्ड य़ुनिव्हर्सिटी आणि अस्ट्राजेनिकाने तयार केलेल्या कोरोना व्हायरस व्हॅक्सिन कोविशील्डची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु होणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने भारतात त्यांच्या कोरोना व्हॅक्सिनच्या उत्पादानासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला पार्टनर केलं आहे. कोविशील्ड सुरक्षित आहे का आणि कोरोनाविरुद्ध किती प्रभावी ठरते याची चाचणी पुण्यातील भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात निरोगी वयोवृद्ध भारतीयांवर घेतली जाणार आहे. 

loading image
go to top