Covid-19 Vaccine: जुलै 2021 पर्यंत 25 कोटी भारतीयांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

सरकार प्रत्येक नागरिकाला लस देण्याची तयारी करत असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

नवी दिल्ली- कोरोना विषाणूची लस भारतात कधी उपलब्ध होईल ? ती लस सर्वात आधी कोणाला दिली जाईल ? लसीकरणाची व्यवस्था कशी असेल ? या सर्व प्रश्नांची उत्तरं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहेत. आपल्या साप्ताहिक 'संडे संवाद'मध्ये त्यांनी सरकार प्रत्येक नागरिकाला लस देण्याची तयारी करत असल्याचे सांगितले. यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जुलै 2021 पर्यंत 20-25 कोटी भारतीयांना कोव्हिड-19 ची लस देण्याचे लक्ष्य असून सरकार 40 ते 50 कोटी डोस प्राप्त करणे आणि त्याचा वापर करण्याची योजना तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Bihar Election: नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढण्यास पासवान यांचा नकार, भाजपशी...

आरोग्य मंत्रालय एक अर्ज तयार करत आहे. यामध्ये राज्ये प्राथमिकता असलेल्या समूहांची माहिती भरतील. अशा लोकांना आधी लस दिली जाईल, असे हर्षवर्धन यांनी सांगितले. ही लस विशेषतः कोव्हिड-19 चे व्यवस्थापन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल. यामध्ये सरकारी, खासगी रुग्णालयांचे डॉक्टरर्स, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ऑक्टोबरपर्यंत ही कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. राज्यांत शीतगृहांशिवाय लस भांडार आणि वितरणाच्या गोष्टींची विस्तृत माहिती मागवण्यात आली आहे. 

हर्षवर्धन पुढे म्हणाले की, सरकार कोव्हिड-19च्या प्रतिकार शक्ती्च्या माहितीवरही नजर ठेवून आहे. या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सिंगल डोस लस मिळणे चांगले होईल. परंतु, सिंगल डोससाठी जेवढी प्रतिकार शक्ती हवी असते तेवढी अनेकवेळा मिळत नाही. साधारणपणे लसीच्या दोन डोसपासून पुरेशी प्रतिकारशक्ती प्राप्त होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Vaccine Estimated to bring 25 crore people under the corona vaccine by July 2021 says Harshvardhan