Coronavirus Vaccine Human Trials : साइड इफेक्ट दिसून आले; पण...

सुशांत जाधव
शनिवार, 25 जुलै 2020

भारतातील कोवाक्सीन नावाच्या लसीची 12 शहरातील 12 रुग्णालयात चाचणी घेण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूला थोपवणाऱ्या लसीचे प्रयोग देशभरात सुरु झाले आहेत. देशातील वेगवेगळ्या 6 राज्यात मानवी चाचणीला सुरुवातही झाली आहे. सध्याच्या घडीला भारत बायोटेक आणि जायडस यांनी शोधून काढलेल्या लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली असून लवकरच ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी देखील मानव चाचणी घेण्यास सुरुवात करणार आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील एम्स रुग्णालयातध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात स्वंयसेवकांची चाचणी घेण्यात येत आहे. दिल्लीतील या रुग्णालयत 30 वर्षांच्या एका युवाला 0.5 मिलीलिटर लसीचा पहिला डोस देण्यात आला. दिल्ली एम्समधील लसीच्या मानवी चाचणीच्या मोहिमेचे प्रमुख डॉक्टर डॉक्टर संजय राय यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ज्या 30 वर्षीय युवकाला लस देण्यात आली त्याला दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्याच्यामध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नसून त्याला घरी सोडण्यात आले आहे. दोन दिवसानंतर पुन्हा त्याची तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.  

दिलासादायक! भारतात कोरोनावरील पहिली लस विकसित; मानवी चाचणीस सुरुवात

भारतातील कोवाक्सीन नावाच्या लसीची 12 शहरातील 12 रुग्णालयात चाचणी घेण्यात येणार आहे. भारत बायोटेक,इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी (NIV) संयुक्तपणे 'कोवाक्सीन' वर काम करत आहेत.  दिल्ली आणि पटना, पीजीआय रोहतक यासह 12 शहरातील 12 रुग्णालयात मानवी चाचणी सुरु आहे. मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात  18 ते 55 वर्ष वयोटातील 500 स्वयंसेवकांची चाचणी घेण्यात येणार आहे. कोणताही आजार नसलेल्या लोकांवर लसीचा प्रयोग करण्यात येणार आहे. कोवाक्सीनची मानवी चाचणी हैदराबाद, पटना, कांचीपुरम, रोहतक आणि नवी दिल्लीमध्ये सर्वप्रथम सुरु झाली. लवकरच नागपुर, भुवनेश्वर, बेळगाव, गोरखपुर, कानपुर, गोवा आणि विशाखापट्टणम या शहरातील रुग्णालयात देखील चाचणीला सुरुवात होणार आहे. 17 जुलै रोजी 3 लोकांना लसीचा डोस देण्यात आला. ज्यांना लस देण्यात येत आहे त्यांना कोणत्याही मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवत नाही. ही गोष्ट चाचणीचा प्रयोग यशाच्या दिशेने सुरु असल्याचे संकेत देणारा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पटनास्थित एम्समध्ये 15 जैलै रोजी 11 स्वयंसेवकावर कोवाक्सीनची मानवी चाचणीचा प्रयोग करण्यात आला. यात कोणावरही लसीचा दुष्परिणाम जाणवलेला नाही. पटना एम्सचे संचालक डॉ. पीके सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणी दरम्यान काही प्रमाणात दुष्परिणाम (साइड इफेक्ट) दिसून येत आहेत. ज्या ठिकाणी सुई टोचली जात आहे त्वचेचा तो भाग लालर होतोय. टोचल्यानंतर वेदना आणि हलका ताप आल्याचेही निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही लसीमध्ये हा प्रकार दिसून येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. पटना एम्समध्ये कोवाक्सीनचा दुसरा डोस 29 जुलैला देण्यात येणार आहे. त्यानंतर या लसीमुळे किती अँटीबॉडीज तयार झाल्याच याची तपासणी करतील. चाचणीच्या पहिल्या टप्प्यानंतर लस किती उपयुक्त ठरेल हे समोर येईल. पहिल्या टप्प्यात लसीचा प्रयोग हा निरोगी व्यक्तींवर करण्यात आला आहे. या लसीच्या सुरक्षिततेबाबतही अभ्यास सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus vaccine human trials know all about the progress and side effects