esakal | न्यायालयाचा ममतांना पाच लाखांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

न्यायालयाचा ममतांना पाच लाखांचा दंड

sakal_logo
By
प्रशांत पाटील

कोलकता - नंदीग्राम विधानसभा निवडणूक प्रकरणाच्या सुनावणीतून कोलकता उच्च न्यायालयाचे (Calcutta High Court) न्यायमूर्ती कौशिक चंदा यांनी माघार घेतली, मात्र त्याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना आक्षेपार्ह प्रयत्नाबद्दल पाच लाख रुपयांचा दंड (Fine) ठोठावला. (Court Fines Mamata Banerjee Rs 5 lakh)

ममता यांनी नंदीग्राममधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या विजयाला आव्हान दिले आहे. अटीतटीच्या निवडणुकीत त्यांचा १९५६ मतांनी पराभव झाला होता. हे प्रकरण न्या. चंदा यांच्याकडे सोपवू नये, कारण ते भाजपच्या जवळचे आहेत, असा आरोप ममता यांनी केला होता.

यानंतर न्या. चंदा यांनी या माघारीचा निर्णय जाहीर केला, पण दंडही ठोठावला. याविषयी सविस्तर भाष्य करताना न्या. चंदा म्हणाले की, असा योजनाबद्ध, मानसशास्त्रीय आणि आक्रमक प्रयत्न ठामपणे प्रतिरोध केलाच पाहिजे. याचिकाकर्त्यांच्या अर्जावर सुनावणी करण्याकडे माझा वैयक्तिक कल नाही. त्याचवेळी सुनावणी घेण्यास मला टाळाटाळही करायची नाही. सरन्यायाधीशांनी योजून दिलेल्या खटल्याची सुनावणी घेणे हे माझे घटनात्मक कर्तव्यच आहे. यानंतरही मी माघार घ्यायचे ठरविले. याचे कारण मी माघार घेतली नाही तर क्षुल्लक गोष्टींवरून तंटा निर्माण करण्याची सवय असणारे लोक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील.

हेही वाचा: मोदींच्या मेगा कॅबिनेटमध्ये नारीशक्तीचा गौरव!

दंडाची रक्कम कोरोनाग्रस्तांसाठी

दंडाची रक्कम भरण्यासाठी ममता यांना दोन आठवड्यांची मुदत आहे. ही रक्कम बार कौन्सिल ऑफ वेस्ट बंगाल या संस्थेकडे जमा करण्यात येईल. कोरोनामुळे मरण पावलेल्या वकिलांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी रकमेचा विनियोग करण्यात येईल.

भाजपशी जवळिकीचे आरोप

जून महिन्यात ममता यांच्या वकीलांनी न्या. चंदा यांच्याकडून सुनावणी काढून घ्यावी अशी मागणी केली होती. त्यांचे भाजपशी जवळिकीचे संबंध असून त्यास व्यावसायिक, आर्थिक आणि विचारसरणीचेही कंगोरे आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला होते. त्याआधी तृणमूल काँग्रेसने एका छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्यात भाजपच्या विधी शाखेच्या कार्यक्रमात दिलीप घोष यांचे भाषण सुरु असताना न्या. चंदा व्यासपीठावर विराजमान असल्याचे दिसत होते.

loading image