
बग्गांवरील अटकेची तलवार कायम
नवी दिल्ली : दिल्ली भाजपचे नेते तेजिंदर सिंग बग्गा यांच्याविरुद्ध पंजाबच्या मोहाली येथील न्यायालयाने आज नव्याने अटक वॉरंट जारी केले. त्यामुळे बग्गा यांना अटक करण्यास पुन्हा जाणार, असे पंजाब पोलिसांनी जाहीर केल्याने आगामी दिवसांत भाजपविरुद्ध ‘आप’ हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी काल पंजाबच्या ताब्यातून नाट्यमयरीत्या सुटका केलेले बग्गा यांच्या अटकेची मागणी करताना पंजाब पोलिसांनी पुन्हा एक याचिका दाखल केली होती.
त्यावर मोहालीचे न्यायदंडाधिकारी रविजेश इंद्रजित सिंह यांनी पुढच्या सुनावणीवेळी बग्गा यांना अटक करून हजर करावे, असा आदेश मोहाली पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखाप्रमुखांना दिला. बग्गा यांच्यावर कलम १५३ अ, ५०५, ५०५(२), ५०६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बग्गा यांना त्यांच्या दिल्लीत पंजाब पोलिसांनी काल सकाळी अटक केली होती. मात्र हरियाना पोलिसांनी त्यांच्या पथकाला अडविले.पंजाब व हरियाना उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली पोलिस बग्गा यांना घेऊन काल मध्यरात्री दिल्लीत परतले.
बग्गा यांना सुरक्षा
दिल्ली पोलिसांनी काल बग्गा यांना दिल्लीत आणल्यावर सुरक्षा व्यवस्था पुरविली आहे. तेजिंदर यांना खोट्या आरोपांखाली अडकविण्याचा प्रयत्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत आहेत, असा आरोप बग्गा यांचे वडील प्रितपाल सिंग यांनी केला आहे. केजरीवाल सरकार हे शिखविरोधी सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला. केजरीवाल यांच्या धमक्यांना आपण भीक घालणार नाही व त्यांच्या हुकूमशाहीविरोधात जाहीर लढा देत राहू असाही इशारा त्यांनी दिला. केजरीवाल हे काश्मिरी पंडितांची माफी मागत नाहीत व आपल्याला अटक करणाऱ्यांना तुरूंगात टाकत नाहीत तोवर ही लढाई रस्त्यावर व न्यायालयात चालू राहील, असा इशारा तेजिंदर बग्गा यांनी दिला. दिल्लीच्या न्यायालयात भाजपने केलेल्या याचिकेवर १० मे रोजी सुनावणी होणार आहे.