स्वदेशी भारत बायोटेकने दिली आनंदाची बातमी; माकडांवरील लशीची चाचणी यशस्वी

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 12 September 2020

कंपनीने एक चांगली बातमी दिली असून प्राण्यांवर करण्यात आलेल्या परिक्षणातून सकारात्मक परिणाम मिळाले असल्याचे जाहीर केले आहे.

नवी दिल्ली- भारत बायोटेक कंपनी कोरोनावरील लस तयार करण्याच्या कामात गुंतली आहे. कंपनीने एक चांगली बातमी दिली असून प्राण्यांवर करण्यात आलेल्या परिक्षणातून सकारात्मक परिणाम मिळाले असल्याचे जाहीर केले आहे. भारत बायोटेक 'कोवॅक्सीन' नावाची लस तयार करत आहे. नुकतेच कंपनीने प्राण्यांवर लशीची चाचणी सुरु केली होती. प्राण्यांच्या शरीरात विषाणूविरोधात SARS-CoV-2 virus लढण्यासाठी मुबलक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन सांगण्यात आले आहे. 

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, परिक्षणामध्ये 20 माकडांना चार गटामध्ये विभागण्यात आले होते. यातील तीन गटांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर 14 दिवसांसाठी त्यांना कोविड विषाणूच्या संपर्कात ठेवण्यात आले. या परिक्षणानंतर माकडांच्या शरीरात कोविड विरोधात प्रभावी प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचं दिसून आलं. शिवाय माकडांच्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत.

लक्षणे नसलेल्या मुलांपासूनही कोरोना संसर्गाचा फैलाव; अमेरिकी शास्त्रज्ञाचा दावा

भारत बायोटेकने जूलैमध्ये मानवी चाचणीचे परिक्षण सुरु केले होते. याआधी कोवॅक्सिन लस 15 ऑगस्टपर्यंत लॉन्च होईल असं सांगण्यात येत होतं. मात्र, भारत बायोटेकची लस पुढच्या वर्षापर्यंत उपलब्ध होणार नाही, असं सरकारने स्पष्ट केले आहे. 

जगभरात 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यातील 8 उमेदवार मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. यूकेतील ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनका लस निर्मितीच्या कामात आघाडीवर होती. मात्र, युकेतील एका स्वयंसेवकामध्ये या लशीचे दुष्परिणाम दिसून आले होते. त्यामुळे ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनका लशीचे परिक्षण थांबवण्यात आले आहे. दुसरीकडे रशियाने कोरोनावर प्रभावी ठरणारी पहिली लस तयार केल्याचा दावा केला आहे. तसेच डिसेंबरपर्यंत ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध करुन देणार असल्याचं म्हटलं आहे. 

ट्रम्प यांच्या मुत्सद्दीपणाला यश! आणखी एका अरब राष्ट्राची इस्त्राईलसोबत मैत्री

काय आहे कोवॅक्सिन?

'कोवॅक्सिन' लस मृत कोरोना विषाणूपासून बनवली जाते. त्यामुळे या लशीचा डोस दिल्यानंतर सक्रिय कोविड विषाणूचा संसर्ग शरीराला होत नाही. भारत बायोटेकने सांगितल्यानुसार या लशीमुळे मृत कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी शरीरात मुबलक प्रतिपिंडे तयार होतात. पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीत लशीची सुरक्षितता तपासली जाते. दुसऱ्या मानवी टप्प्याच्या चाचणीत प्रभावीपणा पाहिला जातो, तर तिसऱ्या टप्प्यात एका मोठ्या गटाला लस दिली जाते. 

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covaxin animal trials generated robust immune response said Bharat Biotech