esakal | गुजरातमध्ये रुग्णालयांत जागा मिळेना; मशिदीत सुरु केलं कोविड सेंटर

बोलून बातमी शोधा

गुजरातमध्ये हॉस्पिटल फुल्ल; मशिदीत सुरू केलं कोविड सेंटर

गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये जागा न मिळण्याचे प्रकार समोर येत आहेत.

गुजरातमध्ये हॉस्पिटल फुल्ल; मशिदीत सुरू केलं कोविड सेंटर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बडोदा - देशात कोरोना रुग्णाचं प्रमाण वेगानं वाढत आहे. अनेक राज्यात कोरोनाला राखण्याासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. यातच अनेक राज्यात लशीचा तुटवडा असल्यानं लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. तर काही राज्यांमध्ये रेमडेसिव्हीर मिळत नसल्यानं उपचारामध्ये अडचणी येत आहेत. गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये जागा न मिळण्याचे प्रकार समोर येत आहेत. दरम्यान, एक सकारात्मक अशी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या वडोदरा शहरात एका मशिदीमध्ये कोरोना रुग्णालय सुरु करण्यात आलं आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी जहांगिरपुरा मशिदीत 50 पेक्षा जास्त बेड लावण्यात आले आहेत. ज्या रुग्णांना रुग्णालयात जागा मिळालेली नाही त्यांच्यावर इथं उपचार केला जात आहे.

जहांगिरपुरा मशिदीच्या ट्रस्टींकडून सांगण्यात आलं की, शहरातील रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला. रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडच्या कमतरतेमुळे मशिदीत कोरोना रुग्णालय सुरु करण्यात आलं आहे. रमजान महिन्यात लोकांसाठी जे चांगलं करता येईल ते आम्ही करत आहे.

जहांगीरपुरा मशिदीशिवाय दारूल उलूममध्येही 120 बेडची सोय करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालकांनी प्रशासनासोबत मिळून ही व्यवस्था केली आहे. यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी मदत होत आहे.

हेही वाचा: गुजरात मॉडेलच्या चिंधड्या; आयसोलेशन वॉर्डमध्ये मृतदेहांचा खच

वडोदऱा इथं कोरोना वेगानं पसरत असून रुग्णांमध्ये मोठ्या संख्येनं वाढ झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड कमी पडत आहेत. या कठीण काळात लोकांच्या मदतीसाठी अनेक धार्मिक संस्था सरसावल्या आहेत.

याआधी वडोदरातल्या स्वामीनारायण मंदिरात 500 बेडचं कोविड रुग्णालय उभारण्यात आलं होतं. याठिकाणी कोरोना रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे. तसचं गरज पडल्यास त्यांना ऑक्सिजनचा पुरवठासुद्दा केला जात आहे.