भारतात दिवसाला 90 हजारांपेक्षा जास्त रुग्ण तरीही आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक बातमी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 September 2020

भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज जवळपास 90 हजारांहून अधिक रुग्ण भारतात सापडत असताना आरोग्य मंत्रालयाने दिलासादायक बातमी दिली आहे. 

नवी दिल्ली: भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दररोज जवळपास 90 हजारांहून अधिक रुग्ण भारतात सापडत असताना आरोग्य मंत्रालयाने दिलासादायक बातमी दिली आहे. शनिवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्येत आता लक्षणीय वाढत आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या मे महिन्यातील 50 हजारांवरून आता सप्टेंबर महिन्यात 36 लाखांपर्यंत पोहचली आहे. सध्या देशात दरदिवशी 70 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येपेक्षा 3.8 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सुरुवातीचे 5 लाख रुग्ण बरे होण्यास 38 दिवसांचा कालावधी लागला होता. आता हा आकडा 38 वरुन 7 दिवसांवर आला आहे. सध्या 7 दिवसांत 5 लाखांच्या वर रुग्ण कोरोनावर मात करत आहेत.  

सरकारने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उचलल्या झटपट पावलांचा हा एक चांगला परिणाम असल्याचे दिसते. एखादा कोरोना रुग्ण मिळाला तर त्याच्या संपर्कात आलेल्यांचे योग्य ट्रॅकींग करणे, कोरोना संशियतांना शोधने, त्यांना विलगीकरण कक्षात ठेवणे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करणे अशा प्रभावी उपाययोजनांद्वारे देशात सरकार कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयन्त करत आहे. चांगल्या प्रतिच्या क्लिनिकल केअरमुळेही कोरोनाच्या रुग्णांचे बरे होण्यात मोठा वाटा आहे.

देशात वाढवलेल्या कोरोना चाचण्यांचीही कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठी मदत होताना दिसतेय. मागील 24 तासांत 10 लाख 71 हजार 702 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर ही शनिवारच्या आकडेवारीसह आतापर्यंत देशात 5 कोटी 62 लाख 60 हजार 928 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) दिली आहे. 

देशातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सध्या जगभरात कोरोनावरील लशींचे संशोधन सुरु असून बऱ्याच लशी त्याच्या मानवी चाचणी टप्प्यात आहेत. रशियाने स्वतःची लस तयार केली असून ती आता प्रत्यक्ष कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. रशियाने तयार केलेली लस आता भारतालाही मिळणार आहे. याबद्दलची चर्चा दोन्ही देशात झाली असून या महिन्यातच रशिया भारतासह त्यांच्या अनेक मित्र देशांना कोरोनावरील लस देणार आहे. इकडं भारतातही बऱ्याच लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. त्यामध्ये भारत बायोटेक तसेच पुण्यातील सिरम संस्थेच्या लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 update recovery rate of corona in India is at peak