Breaking:भारतात कोरोना लसीकरणाला होणार सुरुवात; तारीखही निश्चित

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्या बैठकीला पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे सचिव, कॅबिनेट सचिव उपस्थित होते.

नवी दिल्ली : गेल्या जवळपास दहा महिन्यांपासून सगळ्यांच्या चिंतेचा विषय ठरलेल्या कोरोनावर आता लस तयार झाली असून, ती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कामही सुरू झाले आहे. ब्रिटनसह युरोपातील आणि पश्चिमेतील इतर देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता भारतातही लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

आणखी वाचा - चिडलेला ग्राहक उशी घेऊनच आला बँकेत

भारतात 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार आहे. सध्या भारतात लसीचा दुसऱ्या टप्प्यातील ड्राय रन सुरू असून, देशभरातील जिल्ह्यांमध्ये लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आता प्रत्यक्ष नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून एकाच वेळी देशभरात लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येईल. त्यात डॉक्टर, नर्स यांच्यासह आरोग्य सेवक आणि सेविकांचा समावेश असणार आहे. या टप्प्यात 3 कोटी भारतीय लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय झाला. त्या बैठकीला पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य खात्याचे सचिव, कॅबिनेट सचिव उपस्थित होते.  पुढच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरीक, महिला, गर्भवती स्त्रिया, पोलिस, यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid vaccination in india will start 16 january 2021