
गेल्या एक वर्षापासून देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील लढा आता निर्णायक वळणावर आला आहे.
नवी दिल्ली : गेल्या एक वर्षापासून देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधातील लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. कोरोनावर परिणामकारक ठरतील अशा बऱ्याच कंपन्यांच्या लसींना अनेक देशांनी मान्यता देऊन लसीकरणास सुरवात झालेली आहे. भारतात देखील नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींना मान्यता दिली गेली आहे. आणि आता येत्या 16 जानेवारी पासून लसीकरणास सुरवात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या कार्यक्रमाबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोमवारी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत.
PM Narendra Modi to interact with Chief Ministers of all states via video conferencing today. They will discuss the #COVID19 situation and vaccination rollout. (File photo) pic.twitter.com/VOtjC9uKhw
— ANI (@ANI) January 11, 2021
आज सोमवारी संध्याकाळी चार वाजता ही बैठक नियोजित आहे. व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. भारतातील कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात देशातील तीन कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे.
देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरवात होणार आहे. त्याआधीच अनेक राज्यांकडून म्हटलं गेलंय की पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यामध्ये लसीकरणाचे ठिकाण तसेच आरोग्य कर्मचाऱ्यासमवेत कोरोनाविरोधातील लढाईमध्ये फ्रंटलाईन वर्कर्सचे नोंदणीकरण करणे या साऱ्या बाबींचा समावेश आहे.
हेही वाचा - भूकंपरोधक तंत्रज्ञानाचे अवशेष आढळले
पश्चिम बंगालमध्ये मोफत लसीकरण
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, त्यांच्या राज्य सरकारकडून सर्वच व्यक्तींना मोफत कोरोनाची लस दिली जाण्याची व्यवस्था केली जात आहे. यासंदर्भातील एका खुल्या पत्रात ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, कोरोनाविरोधातील लढाईमध्ये पोलिस, होमगार्ड, फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्याने आधी लस दिली जाईल.