"काऊ', "गुजरात'चा आवाज बंद करा; सेन्सॉर बोर्डाची अजब सूचना

श्‍यामल रॉय
गुरुवार, 13 जुलै 2017

नोबेल पुरस्कार विजते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात "काऊ' यासह चार शब्दांवर आक्षेप घेत हे शब्द माहितीपटात उच्चारताना त्या वेळी आवाज बंद करावा, अशी अजब सूचना केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने केली आहे, अशी माहिती दिग्दर्शक सुमन घोष यांनी बुधवारी दिली.

कोलकता - नोबेल पुरस्कार विजते ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यावरील माहितीपटात "काऊ' यासह चार शब्दांवर आक्षेप घेत हे शब्द माहितीपटात उच्चारताना त्या वेळी आवाज बंद करावा, अशी अजब सूचना केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने केली आहे, अशी माहिती दिग्दर्शक सुमन घोष यांनी बुधवारी दिली. दरम्यान, हा माहितीपट शुक्रवारी (ता. 14) रोजी येथे प्रदर्शित करण्यात येणार होता; मात्र सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप मंजुरी न मिळाल्याने ते प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

अमर्त्य सेन यांच्यावर "द अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' हा माहितीपट घोष दिग्दर्शित करत आहेत. सेन्सॉर बोर्डाच्या कोलकता येथील विभागीय कार्यालयात मंगळवारी (ता. 11) तीन तास चर्चा झाली. या वेळी माझा माहितीपटही दाखविण्यात आला. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य यातील प्रत्येक भागाची कसून छाननी करत होते. त्यानंतर माहितीपटाला "यू/ए' प्रमाणपत्र देण्यासाठी त्यातील "काऊ', "गुजरात', "हिंदुत्व व्ह्यू ऑफ इंडिया' आणि "हिंदुत्व इंडिया' या चार शब्दांच्या वेळी आवाज बंद करण्याची तोंडी सूचना सदस्यांनी केली,'' असे घोष यांनी सांगितले. यावर आपण असमर्थतता व्यक्त केल्याचेही ते म्हणाले.

""अमर्त्य सेन व मुलाखतकार अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसू यांच्यामधील चर्चेत उच्चारलेले हे शब्द काढून टाकल्यास माहितीपटाचा आत्माच हरवेल,'' असे घोष म्हणाले. सेन्सॉर बोर्डाकडून लेखी उत्तराच्या व हा माहितीपट ते मुंबईत परीक्षण समितीकडे पाठविणार का याच्या प्रतीक्षेत आपण आहोत. सध्या चित्रपटांना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात लवकरच मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे; मात्र माहितीपटातून हे शब्द वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कोणत्याही परिस्थितीत आपली भूमिका ठाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. घोष यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास बोर्डाच्या सदस्याने नकार दिला.

सेन यांच्या कारकिर्दीचा आढावा
एक तासाच्या या माहितीपटात "सोशल चॉइस थिअरी', अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान यांचा विकास आणि भारतासह जगात वाढणारा उजव्या विचारसरणीचा राष्ट्रवाद, गुजरातमधील गुन्हेगारी, गायीवरून निर्माण झालेले वादंग या विषयांवर अमर्त्य सेन यांनी मते व्यक्त केली आहेत. त्यातील "गुजरात' व "गाय' या शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे. सेन यांच्या 2002पासून 15 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा यात घेतला आहे. त्यांचे विद्यार्थी व अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसू व सेन यांच्यातील संवाद रूपाने हा माहितीपट उलगडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cow marathi news national news amartya sen