Crime News : दिल्लीतील युवतीच्या मारेकऱयांत भाजप कार्यकर्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news a girl killed by bjp member aap allegations delhi politics

Crime News : दिल्लीतील युवतीच्या मारेकऱयांत भाजप कार्यकर्ता

नवी दिल्ली - दिल्लीतील सुलतानपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच समाजकंटकांनी एका मुलीला तिच्या गाडीसह कारने अनेक किलोमीटरपर्यंत फरपटत नेऊन तिची हत्या केल्याच्या भयानक गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींपैकी एक भाजपचा सदस्य असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने (आपने) केला आहे.

दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना हे दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप आप ने केला आहे. दरम्यान महिलांबाबतच्या गुन्ह्यातील अशा आरोपींना, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असले तरी त्यांना फाशीच झालीच पाहिजे

असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ' असल्याचे सांगून केजरीवाल म्हणाले की या तरूणीबरोबर सोबत जे घडले ते अतिशय घृणास्पद व लज्जास्पद असून सर्व आरोपींना कठोरात कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.

या धक्कादायक घटनेबाबत आपचे प्रवक्ते व मंत्री सौरभ भारद्वाज यांनी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी मनोज मित्तल हा भाजपचा कार्यकर्ता आहे असा आरोप केला. काही छायाचित्रे दाखवून भारद्वाज म्हणाले की मंगोलपुरी पोलिस स्टेशनच्या अगदी शेजारी एक होर्डिंग आहे,

ज्यामध्ये मित्तल याचा फोटो आहे आणि तो भाजपचा कार्यकर्ता- सदस्य आहे. सक्सेना यांना उपराज्यपाल पदावरून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी करून भारद्वाज म्हणाले की सक्सेना पोलिस अधिकाऱयांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात दिल्लीबद्दल त्यांना काहीच माहिती नाही.

मी त्यांना सुलतानपुरी येथे सोडले तर नजफगड कोणत्या दिशेला आहे हेही त्यांना कळणार नाही. एका महिलेला एक कार रस्त्यावरून फरपटत नेत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिलेल्या प्रत्यक्षदर्शीने २२ वेळा फोन केला, आमच्या गाडीखाली पॉलिथिन अडकले तरी आवाज येतो आणि आम्ही लगेच खाली उतरतो.

इथे एक मृतदेह १२ किमीपर्यंत फरपटत नेला गेला होता आणि दिल्ली पोलीस सांगत आहेत की संगीत खूप जोरात वाजत असल्याने त्याबाबत आरोपी अनभिज्ञ होते. हे सारे हास्यास्पद नव्ह तर गंभीर आहे.

दरम्यान आपच्या आरोपाला उत्तर देताना दिल्ली भाजपचे प्रवक्ते हरीश खुराना म्हणाले की पोलिसांनी मित्तलसह आरोपींना अटक केली आहे. दोषी कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे.

टॅग्स :BjppoliticalaapDesh news