esakal | सीमेवरील तणावावरून राहुल गांधींकडून टीका
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

सीमेवरील तणावावरून राहुल गांधींकडून टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लडाख सीमेपाठोपाठ उत्तराखंडच्या सीमेवरही चिनी सैन्याची जमवाजमव झाल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदींचा ‘मिस्टर ५६ इंच’ असा खोचक उल्लेख करून राहुल यांनी भारताच्या भूमीवर चिनी कब्जा वाढत असल्याचा प्रहार केला आहे.

लडाखजवळ ताबारेषेवरील तणाव आणि मागील वर्षी गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीनंतर भारत आणि चीनदरम्यानची तणातणी कमी झालेली नाही. लष्करी आणि राजनैतिक पातळीवर वाटाघाटीच्या डझनभर फेऱ्या होऊनही मोजके संघर्षबिंदू वगळता चिनी सैन्याने माघार घेतलेली नाही. एवढेच नव्हे तर, सीमा भागात चिनी सैन्याने पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढविणे सुरू केले असून लडाखसोबतच उत्तराखंडच्या सीमेजवळही चिनी सैन्याची उपस्थिती वाढली आहे. प्रत्युत्तरादाखल भारतानेही तुल्यबळ सैन्य तैनात केले असून लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चिनी सैन्याच्या हालचालींबद्दल चिंता व्यक्त करताना भारतीय लष्कराच्या जय्यत तयारीचाही दाखला दिला आहे. सोबतच, पुढील आठवड्यात होणाऱ्या लष्करी पातळीवरील वाटाघाटींमध्ये सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरणात राजकारण्यांचा हात?; समीर वानखेडे म्हणतात...

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी चीनच्या घुसखोरीचा संदर्भ देत खोचक ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. लडाख आणि उत्तराखंड या हॅशटॅगचा वापर करून राहुल गांधींनी ‘चीन + पाकिस्तान + श्रीयुत ५६ इंची = भारतीय भूमीवर चीनचा वाढता कब्जा’, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधीही राहुल गांधींनी चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींवर आक्रमक भाषेत टिकास्त्र सोडले आहे.

loading image
go to top