कावळ्यांना आपलेसे करणारा माणूस!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

कावळ्यांचा विश्वास संपादन करणे खूप कठीण आहे. असे म्हणतात की कावळे माणसांवर कधीच विश्वास ठेवत नाही. मात्र, गुजरातच्या भुज जिल्ह्यातील डायालाल जैराम खत्री काका हे मागील १६ वर्षांपासून कावळ्यांना दररोज नियमितपणे जेवण घालतात. त्यामुळे हे कावळे मोठ्या आनंदाने त्यांच्या अंगाखांद्यावर खेळतात.
 

मुंबई : पितृपक्षाचा महिना असल्याने या महिन्यात आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी लोक काय-काय करत नाही. ब्राह्मणांना जेवणापासून दक्षिणा देतात. कावळ्यांना खीर-पोळी खाऊ घालतात. तर काही लोक अनाथाश्रमातीला मुलांना जेवण देतात. काही समाजामध्ये बहिणी, भाच्यांना जेवण घालण्याची परंपरा आहे. मात्र, गुजरातच्या भुज जिल्ह्यातील डायालाल जैराम खत्री काका हे मागील १६ वर्षांपासून कावळ्यांना दररोज नियमितपणे जेवण घालतात. डायालाल हे एसटीचे निवृत्त कर्मचारी आहेत.

कावळे आहेत डायालाल यांचे मित्र
कावळ्यांचा विश्वास संपादन खूप कठीण आहे. असे म्हणतात की कावळे माणसांवर कधीच विश्वास ठेवत नाही. तसेच माणूसही कावळ्यांवर कधीच विश्वास ठेवत नाही. लहानपणी कावळ्याने हातातून पोळी पळवल्याचा अनुभव सर्वांनाच आला असेल. परंतु, याच कावळ्यांना पितृपक्षात खीर-पोळी खाऊ घालत माणूस स्वतःला धन्य समजतो. कावळा हा खूप चलाख पक्षी आहे, म्हणून त्याला आजपर्यंत कोणीच पिंजऱ्यात बंदीस्त केलेले पाहिलेले नाही. डायालाल मात्र, मागील १६ वर्षांपासून दररोज सकाळी कावळ्यांच्या घोळक्यात बसलेले असतात. जवळपास दीड ते दोन तास ते या कावळ्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालतात. त्यांचे म्हणणे आहे की, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कावळ्यांना वाचवणे, खूप गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

डायालाल यांच्या हातावर खेळतात कावळे
कावळ्याचा स्पर्श अपवित्र मानला जातो. मात्र, डायालाल यांना कावळे शरिरावर बसल्याचे काहीही वाटत नाही. त्यांना या सर्वांची सवय पडली आहे. ते या कावळ्यांना हूसकावून लावतात मात्र, ते पुन्हा डायालाल यांच्या हातावर बसतात. 

कावळेवाले काका
डायालाल यांना लोक आदराने कावळे वाले काका या नावाने ओळखतात. डायालाल हे या कावळ्यांना बुंदी, खीर यांसारखे त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला देतात. नियमितपणे खायला देण्यातून डायालाल यांना त्यांच्या आवडी-निवडीच्या सर्व गोष्टी माहिती झाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crows is a friend of Dyalal khatri