
Rahul Gandhi : राहूल गांधींनीच ११३ वेळा सुरक्षा नियम तोडले; सीआरपीएफचा खुलासा
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा झाल्याच्या काँग्रेसच्या तक्रारीला उत्तर देताना केंद्रीय राखीव सुरक्षा दलाने म्हटले आहे की 'भारत जोडो' यात्रेदरम्यानही राहुल गांधींनी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे (प्रोटोकॉल )वारंवार उल्लंघन केले असून २०२० पासून आतापावेतो किमान ११३ वेळा सुरक्षा प्रोटोकॉल तोडला आहे.
भारत जोडो यात्रा दिल्लीत आली तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती. या दरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देण्यात आले होते. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी पत्र लिहून तक्रार केली होती. २४ डिसेंबर रोजी दिल्लीत 'भारत जोडो' यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत कुचराई झाल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान सीआरपीएफने स्पष्ट केले की राहुल गांधींना मार्गदर्शक तत्त्वांनुसारच सुरक्षा देण्यात येत आहे. सीआरपीएफ राज्य पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या समन्वयाने सुरक्षा व्यवस्था करते. गृह मंत्रालयाने व्हीआयपी नेत्यांच्या ‘धोक्याच्या मुल्यांकना‘बाबत जारी केलेल्या सल्ल्यानुसार प्रत्येक नेत्याच्या दौऱयावेळी राज्य सरकारांच्या सहकार्याने अॅडव्हान्स सिक्युरिटी लायसन्स (एएसएल) तयार केले जातात.
'भारत जोडो' यात्रेच्या दिल्ली प्रवासासाठी २२ डिसेंबर रोजीच सुरक्षा यंत्रणेची तैनाती ठरविण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले होते आणि पुरेशा प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. कोणत्याही व्यक्तीच्या सुरक्षेसाठीची व्यवस्था तेव्हाच योग्य प्रकारे कार्य करते जेव्हा ती व्यक्ती स्वतः सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे योग्य प्रकारे पालन करते असेही सीआरपीएफने निवेदनात सुनावले आहे.
राहुल गांधी यांनी स्वतःच शेकडो वेळा सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यांनाही त्याबाबत अनेकदा सावधगिरीचा सल्ला वा माहिती देण्यात आली आहे. २०२० पासून आत्तापर्यंत राहूल गांधी यांनी ११३ वेळा सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याचे सीआरपीएफने म्हटले आहे.
नक्वी : हे तर ‘टी शर्ट' चे ‘टशन'
राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा म्हणजे ‘टी शर्ट' चे ‘टशन' बनले आहे असे टीकास्त्र माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी सोडले आहे. ते म्हणाले की या यात्रेत मिशन नव्हे तर टीव्ही सेशनच जास्त चर्चेत आहे. कॉंग्रेसचे लोक कधी म्हणताता कोरोनाच्या कारणामुळे यात्रेला रोखण्याचे प्रयत्न होतात, कधी म्हणताता सुरक्षेत त्रुटी झाली.
पण जेव्हा तुम्हाला सरकारतर्फे सुरक्षा पुरिवली जाते तेव्हा सुरक्षा यंत्रणेच्या मार्गर्शिकेचे पालन संबंधित प्रत्येकानेच केले जाते. भारत जोडो यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंना जरा गावागावांत, रस्त्यांवर फिरू द्या म्हणजे त्याना कळेल की नरेंद्र मोदी सरकारच्या विकासाभिमुख धओरणांमुळे समाजात कसे सकारात्मक परिवर्तन आले आहे ,असेही नक्वी म्हणाले.