जम्मू-काश्‍मीर हळूहळू येतेय पूर्वपदावर; संचारबंदी शिथिल

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

जम्मूतील पाचही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून, सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही वाढली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने शनिवारी (ता.10) उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत झाले असून, डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे.

जम्मूतील पाचही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून, सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही वाढली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

जम्मू, कथुआ, सांबा, उधमपूर आणि रियासी या पाचही जिल्ह्यांतील सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आले आहेत. काश्‍मीर खोरे हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, पाच ऑगस्टपासून येथे एकही अनुचित घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या भागातील शुक्रवारची प्रार्थना शांततेत पार पडल्यानंतर आज व्यापार संकुले आणि दुकाने सुरू झाली होती. पूँछ, राजौरी आणि रामबन या जिल्ह्यांतील संचारबंदी मात्र कायम आहे. 

येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये जम्मू- काश्‍मीरमधील परिस्थिती निवळेल, सध्या पाकिस्तानातील नेतेमंडळी चिथावणीखोर आणि बेजबाबदार विधाने करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सरकारने योग्य पावले उचलली आहेत. 
- जी. किशन रेड्डी, केंद्रीय गृहराज्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curfew relaxation in Jammu and Kashmir