ठाकरेंच्या खच्चीकरणाची भाजपची खेळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

current political situation in maharashtra 2022 BJP trying to destroyed shiv sena leadership Aditya Thackeray uddhav Thackeray delhi

ठाकरेंच्या खच्चीकरणाची भाजपची खेळी

नवी दिल्ली : शिवसेनेत पडलेली फूट केवळ विधिमंडळ पक्षातील विभाजनापुरती मर्यादित राहणार नसून शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेसह, नगर पालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही विभाजन घडून ठाकरे कुटुंबाच्या नेतृत्वाचे पुरते खच्चीकरण करण्याची खेळी भाजपने आखली आहे. भाजपकडून सरकार स्थापनेसाठी कोणतीही घाई केली जाणार नाही. मात्र या राजकीय जुगलबंदीचा सरकारवर परिणाम होणार असेल तर प्रसंगी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही मागणी केली जाऊ शकते, असेही भाजपच्या गोटातून समजते.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आधी सुरत वारी आणि त्यानंतर गुवाहाटीतून सूत्रसंचालन या वेगवान घडामोडींशी जवळून संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले, की विधानसभा निवडणुकीत सत्ता विभाजनाचे सूत्र मान्य करूनही शिवसेना नेतृत्वाने विश्वासघात केला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ता स्थापन केली. हा विश्वासघात जिव्हारी लागल्याने ही रणनीती आखण्यात आली आहे. यातील पहिला टप्पा म्हणजे शिंदेंच्या गटामध्ये जास्तीत जास्त शिवसेना आमदारांना ओढणे आणि हा गटच खरा शिवसेना पक्ष आहे हे सिद्ध करणे आहे. परंतु तेवढ्या पुरते मर्यादित न शिवसेनेच्या उर्वरित सत्ताकेंद्रांमध्येही विभाजन घडवून ती शिंदे गटाच्या ताब्यात आणण्याची व्यूहरचना आहे. विधानसभेऩंतर लोकसभेतही या पक्षाचे विभाजन अपरिहार्य आहे.

सरकार कोसळेपर्यंत कोणतीही घाई करायची नाही आणि बोलायचेही नाही याची सक्त ताकीद केंद्रातून देण्यात आली आहे. मात्र सरकार स्थापनेचे सूत्रही भाजपकडून तयार करण्यात आले आहे. अंतिमतः नव्या सरकारचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हेच करतील. तर शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाऊ शकते. वाटाघाटींसाठी गुवाहाटीतून शिंदे आणि समर्थक आमदारांना दिल्लीत आणणार का, यावर. कोरोना काळात सर्वांना ऑनलाइन संपर्काची सवय झाली आहे, अशी मिस्कील टिप्पणी या सूत्रांनी केली. बंडाच्या कारणाबद्दल या सूत्रांनी सांगितले, की ठाकरे कुटुंबाला राजेशाही व्यवहारामुळे नेते दुखावले गेले. कोकणातील एका मंत्र्याला अतिमहत्त्व देण्यात येत होते. प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांकडे जाणारी गुप्त माहिती या मंत्र्याकडे आधी जात होती.

मतमोजणी थांबल्यानंतर...

विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शिवसेनेतील बंडाच्या नाट्याला गती आल्याचे कळले. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी काही तासांसाठी थांबविण्यात आली होती. त्यावेळी सारे जण या घटनाक्रमाचे आणि मतमोजणीचे विश्लेषण करण्यात गुंग असताना त्याच वेळी शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मुंबईतून बाहेर काढून गुजरातच्या वाटेला लावण्यात आले. या सर्व आमदारांनी गुजरात हद्दीत प्रवेश करून त्यांच्या ताफ्याला गुजरात पोलिसांचे संरक्षण कवच मिळाल्यानंतर इकडे पुन्हा मतमोजणी सुरू झाली.

Web Title: Current Political Situation In Maharashtra 2022 Bjp Trying To Destroyed Shiv Sena Leadership Aditya Thackeray Uddhav Thackeray Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..