esakal | काँग्रेस अध्यक्ष कोण? सोनिया गांधींनी राजीनामा दिल्यास महाराष्ट्रातील नेत्यासह तिघांची नावे चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and sonia gandhi

काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचा दावा केला जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष कोण? सोनिया गांधींनी राजीनामा दिल्यास महाराष्ट्रातील नेत्यासह तिघांची नावे चर्चेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - काँग्रेसमध्ये आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले असून यावरूनही पक्षांतर्गत दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सोमवारी होणाऱ्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आता भाकरी फिरवाच अशी मागणी विविध ज्येष्ठ नेत्यांकडून हायकमांडकडे केली जाऊ लागली आहे. काही विद्यमान खासदार आणि माजी मंत्र्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी केली असून अन्य मंडळी मात्र पक्षाचे नेतृत्व हे राहुल गांधी यांच्याकडे सोपविले जावे म्हणून आग्रही आहेत.

पक्षाच्या बारापेक्षाही अधिक नेते आणि काही माजी मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी संघटनात्मक संरचनेतील सर्वांगिण बदल आणि नव्या नेतृत्वाचा आग्रह धरल्याचे दिसून येते. दुसरीकडे राहुल गांधी यांच्या जवळच्या नेत्यांनी काँग्रेस कार्यकारी समितीला उद्देशून एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी पक्षाची धुरा ही पुन्हा राहुल यांच्याकडेच सोपविण्यात यावी अशी आग्रही मागणी केली आहे. यामुळे कार्यकारी समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

राजीनामा देण्याची तयारी?
काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचा दावा केला जात आहे. तसेच, अध्यक्ष पदासाठी योग्य व्यक्ती सापडेपर्यंत त्या पद सांभाळू शकतात, असेही सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी मात्र अध्यक्षपद पुन्हा स्वीकारण्यास तयार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. सोनिया यांनी पद सोडण्याची तयारी केलीच असेल तर मात्र राहुल यांनी पुढे होत अध्यक्षपद सांभाळावे, असे आवाहन अशोक गेहलोत यांनी केले आहे. प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मात्र सोनियांच्या राजीनाम्याबाबतचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

हे वाचा - काँग्रेसमध्ये फुटलेला 'लेटर बॉम्ब' काय आहे? वाचा राहुल, प्रियंका गांधींपुढील आव्हानं

अध्यक्षपदासाठी तीन नावे चर्चेत
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. आता सोनिया गांधी यांनी राजीनामा दिल्यास नेतृत्व कोणाकडे असा प्रश्न काँग्रेससमोर आहे. सध्या यात तीन नावांची चर्चा होत असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, एके अँटनी किंवा महाराष्ट्रातील जेष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्याकडे हंगामी अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनाचे संकट गेल्यानंतर काँग्रेस पुन्हा राहुल गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देऊ शकते.