Cyclone Mandous: मंडस चक्रीवादळाचा रेड अलर्ट 'या' राज्यांसाठी धोक्याची घंटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyclone Mandous

Cyclone Mandous: मंडस चक्रीवादळाचा रेड अलर्ट 'या' राज्यांसाठी धोक्याची घंटा

Cyclone Mandous: देशाच्या दक्षिण भागात ‘मंडस’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हे चक्रीवादळ आज चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. याबाबत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या राज्यांतील अनेक जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईस्थित प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन तासांत तिरुवल्लूर, चेन्नई, चेंगलपट्टू आणि कांचीपुरम जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, रानीपेट्टई, वेल्लोर, तिरुपत्तूर, कृष्णगिरी, धर्मपुरी, तिरुवन्नमलाई, कल्लाकुरीची, अरियालूर, पेरांबलूर, तिरुचिरापल्ली, करूर, इरोड, सेलम येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतील नमक्कल, थिरुपूर, कोईम्बतूर, निलगिरी, दिंडीगुल, थेनी, मदुराई, शिवगंगाई, विरुधुनगर आणि तेनकासी जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

त्याचवेळी, हवामान खात्याने (IMD) आज तामिळनाडूतील तीन जिल्ह्यांमध्ये चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. अंदाजानुसार, मंडस चक्रीवादळामुळे बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होऊ शकते. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या उत्तर किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा: छत्रपतींच्या अवमानाविरुद्ध बोलणाऱ्या खासदार कोल्हेंचा माईक केला बंद; मनसेने म्हटलं...

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर तामिळनाडूच्या 10 जिल्ह्यांमध्ये NDRF आणि राज्य सुरक्षा दलाच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 'मांडस' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि कांचीपुरम जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडस चक्रीवादळ आज मध्यरात्री आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्येला तयार झालेले चक्रीवादळ मंडस बुधवारी 'तीव्र' चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे ताशी 105 किमी वेगाने वारे वाहू शकतात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास महाबलीपुरमजवळ तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी ते हळूहळू चक्रीवादळात कमकुवत होईल.

टॅग्स :Chennai