Cyrus Mistry Accident Updates: मिस्त्रींच्या मृत्यूला डॉ. अनाहिता जबाबदार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyrus Mistry Accident Updates

Cyrus Mistry Accident Updates: मिस्त्रींच्या मृत्यूला डॉ. अनाहिता जबाबदार?

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. मिस्त्री यांच्या मृत्यूला डॉ. अनाहिता जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात चार्टशिट दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी आरोपपत्र 4 जानेवारी रोजी पालघर जिल्हा न्यायालयात दाखल केलं. हे आरोपपत्र 152 पानांचं असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं. कासा पोलिसांनी बुधवारी शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनाहिता पंडोले यांच्याविरुद्ध चार्टशिट दाखल केलं, अपघाताच्या वेळी त्या गाडी चालवत होत्या.

हेही वाचा: Cyrus Mistry death: निष्काळजीपणाने गेला मिस्त्रींच्या जीव? चालक अनाहितांना सातवेळा बसलेला दंड

डहाणू सत्र न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात काय म्हटलं आहे?

दुपारी 2.34 वाजता अपघात झाला तेव्हा अनाहिता गाडी चालवत होत्या, असं सुमारे पाच साक्षीदारांच्या जबाबातून समोर आलं आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी अनाहिताला अनेक शस्त्रक्रिया आणि आरामाची गरज असल्याने अटक करण्यात आली नव्हती.

अनाहिता अजूनही तिच्या दुखापतीतून बरी होत असल्याचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे. तसंच 24 डिसेंबर 2022 रोजी तिला तिच्या चर्चगेट येथील घरी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 41 (A) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र “अनाहिता अजूनही दुखापतीतून बरी होत असल्याने तिने प्रतिसाद दिला नाही', अशी माहिती डेरियस यांनी दिली.

हेही वाचा: Cyrus Mistry Death : सायरस मेस्त्रींच्या अपघाताची मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

अनाहिताने तिचा सीट बेल्ट नीट लावला नव्हता किंवा तिने तिच्या सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावला असल्याची खात्री केली नव्हती. आरोपपत्रात अनाहिताचा ड्रायव्हिंग करताना निष्काळजीपणा आणि तिचे धोकादायक ओव्हरटेकिंग मिस्त्री आणि जहांगीर यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे, शिवाय तिचा पती डॅरियस आणि तिला स्वतःला दुखापत झाली आहे.

हेही वाचा: Cyrus Mistry : अपघातापूर्वी ताशी 100 चा वेग अन् 5 सेकंद आधी...; मर्सिडीजचा अहवाल काय?

निष्काळजीपणा, बेजबाबदारपणे गाडी चालवणे, ओव्हरटेकिंग, लेनची शिस्त न पाळणे आणि ड्रायव्हरच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे यासह विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अनाहिताविरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता.

सुमारे 4 महिन्यांपूर्वी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांच्या एका सहप्रवाशाचा कार अपघातात मृत्यू झाला होता. सायरस मिस्त्री 54 वर्षांचे होते. गेल्या वर्षी 4 सप्टेंबर रोजी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून जात असताना त्यांची आलिशान कार सूर्या नदीवरील पुलावरील दुभाजकावर आदळल्याने त्यांचा भीषण अपघात झाला होता. या घटनेत सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला, तर कार चालवत असलेल्या अनाहिता पंडोले आणि डेरियस पंडोले हे गंभीर जखमी झाले.

टॅग्स :accident case