...म्हणून दाभोळकरांची हत्या : गुलजार

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

''विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे या अशा विचारवंतांच्या हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे''.

- गुलजार, ज्येष्ठ कवी

नवी दिल्ली : ''अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांनी समाजातील वाईट रुढी, परंपरा यांविरोधात आवाज उठवला होता. ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले'', असे मत ज्येष्ठ कवी गुलजार यांनी व्यक्त केले. 

गुलजार यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यादरम्यान गुलजार यांना विचारवंतांच्या हत्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी गुलजार म्हणाले, ''विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यामुळे या अशा विचारवंतांच्या हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दाभोळकरांची हत्या करणाऱ्यांना शोधण्यात अद्यापही यश आलेले नाही. तसेच एम. एम. कलबुर्गी हे विचारवंत आणि लेखक होते. धारवाड येथे 2015 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यांचेही मारकरी अद्याप सापडलेले नाहीत. याशिवाय कॉम्रेड पानसरे हे डाव्या विचारांचे समर्थक होते. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, या सर्वांच्या मारेकऱ्यांचा अद्याप तपास लागला नाही''. समाजातील या घटनांमुळे गुलजार यांनी दु:ख व्यक्त केले. 

दरम्यान, दाभोळकर, पानसरे किंवा कलबुर्गी या सर्वांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले. असे करताना ते बोलले म्हणून मारले गेले, असेही गुलजार म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dabholkar Kalburgi And Pansare Spoke Up Thats Why They Got Murdered Says Gulzar