धक्कादायक! अमेठीत दलित गाव प्रधानाच्या पतीला जाळले जिवंत

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 30 October 2020

केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्या अमेठी मतदारसंघात एका गावातील दलित प्रधानाच्या पतीला जिवंत जाळण्याची घटना समोर आली आहे.

लखनऊ- केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्या अमेठी मतदारसंघात एका गावातील दलित प्रधानाच्या पतीला जिवंत जाळण्याची घटना समोर आली आहे. पीडित व्यक्ती 90 टक्के जळालेल्या अवस्थेत गावातील एका कथित उच्च जातीय व्यक्तीच्या घराजवळ सापडला, हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. प्रधानने गावातील 5 व्यक्तींवर आपल्या पतीला जिंवत जाळल्याचा आरोप केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी हत्येची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

अमेठीतील बंदुहिया गावातील प्रधान छोटका यांचे पती अर्जुन गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता गावात चहा पिण्यासाठी गेले होते. तेथून ते गायब झाले. प्रधान छोटका यांनी आरोप केलाय की, गावातील कृष्ण कुमार तिवारी आणि त्यांच्या चार साथीदारांनी त्यांना पकडून नेले आणि घराजवळीत परिसरात त्यांना जीवंत जाळले. छोटका यांच्या म्हणण्यानुसार आरोपी कृष्ण कुमार त्यांना पैशांसाठी धमकी देत होता. कृष्ण कुमार यांचं म्हणणं होतं की, प्रधानजवळ मोठ्या प्रमाणात सरकारी पैसा असतो. यातील काही पैसे त्यांनाही मिळावेत. पण, याला नकार दिल्याने अर्जुन यांना जिवंत जाळण्यात आले. 

अमेरिकेतील निवडणुकीत साताऱ्याची झलक! बायडेन यांनी भर पावसात गाजवली सभा

अमेठीचे एसपी दिनेश सिंह यांनी माहिती दिली की, पोलिसांना रात्री 12 वाजता घटनेची माहिती मिळाली. अर्जुन हे कृष्ण कुमार यांच्या घराजवळच्या आवारात सापडल्यानंतर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आहे. तेथून त्यांना सुलतानपूर जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचे सांगण्यात आले. चांगल्या उपचारासाठी त्यांना लखनऊमध्ये घेऊन जाण्यात येत होते. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

अर्जुन यांच्या कुटुंबीयांनी त्यांची जळालेल्या अवस्थेतच त्यांची साक्ष मोबाईलमध्ये रिकॉर्ड केली आहे, ज्यात ते गावातील पाच व्यक्तींचे नाव घेताना दिसत आहेत. माहितीनुसार, केके तिवारी, आशुतोष, राजेश, रवी आणि संतोष यांची अर्जुन यांनी नावे घेतली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dalit village chief husband burnt alive in Amethi uttar pradesh