अमेरिकेतील निवडणुकीत साताऱ्याची झलक! बायडेन यांनी भर पावसात गाजवली सभा

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 30 October 2020

अमेरिकेतील राष्ट्रपतीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आमने-सामने आहेत. दोन्ही नेत्यांनी निवडणुकीत बाजी मारण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. त्यातच ज्यो बायडेन यांनी भर पावसात सभा घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बायडेन जोराचा पाऊस सुरु असतानाही जनतेला संबोधित करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणातील आठवण झाली असेल.

ज्यो बायडेन फ्लोरिडामध्ये सभा घेत होते. सभेदरम्यान अचानक जोराचा पाऊस सुरु झाला. पण, बायडेन यांनी आपलं भाषण थांबवलं नाही, उलट त्यांनी अधिक जोशाने सभेला संबोधित केले. डेमोक्रॅटकडून यासंदर्भातील एक फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला आहे. या फोटोला 14,000 पेक्षा अधिकवेळा रिट्विट करण्यात आले आहे, तर दिड लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत. ''हे वादळ निघून जाईल आणि नवा दिवस उजाडेल'', असं कॅप्शन ज्यो बायडेन यांनी या फोटोला दिलं आहे. 

आरोग्य सेतू ऍपबाबत गोलमोल उत्तरे देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; केंद्र...

भर पावसातील या सभेनंतर सोशल मीडियातून बायडेन यांचे कौतुक होत आहे. बायडेन यांचे समर्पण पाहून अनेकांची मने जिंकली गेली आहेत. ज्यो बायडेन यांची पावसातील सभा पाहून अनेकांना साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेची आठवण झाली. विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची साताऱ्यात प्रचारसभा होत होती. यावेळी अचानक पाऊस सुरु झाला. अशा परिस्थितीतही शरद पवारांनी सभा घेतली. ही सभा चांगलीच गाजली. पवारांच्या पावसातील सभेचा राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणात फायदा झाल्याचे सांगितले जाते.  

दरम्यान, काही दिवसांपूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनीही भर पावसात सभा घेतली होती. त्यांनी सभेदरम्यान डान्सही केला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election democratic joe biden rally in rain