esakal | लोक त्यांना वेडा म्हणायचे पण त्याच वेडेपणासाठी पद्मश्रीने गौरवण्यात आलं

बोलून बातमी शोधा

Daripalli Ramaiah

रामैय्या यांच्या सवयीला लोकांनी वेडेपणा म्हटलं. मात्र याच वेडेपणासाठी त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

लोक त्यांना वेडा म्हणायचे पण त्याच वेडेपणासाठी पद्मश्रीने गौरवण्यात आलं
sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या बरीच असते. पण त्यापैकी किती लोक लावलेल्या त्या रोपट्याची निगा राखतात आणि त्याचं मोठं झाड होतं हाच प्रश्न आहे. भारतातील एक व्यक्ती अशी आहे ज्याला ट्री मॅन म्हणून ओळखलं जातं. सध्या 83 वय असलेल्या या व्यक्तीने आतापर्यंत एक कोटीहून अधिक झाडे लावली आहेत. झाडं लावण्याच्या रामैय्या यांच्या सवयीला लोकांनी वेडेपणा म्हटलं. मात्र याच वेडेपणासाठी त्यांना 2017 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. तेव्हा लोकांनी त्यांचे कौतुक करायला सुरुवात केली. 

दारिपल्ली रामैया असं त्यांचे नाव. त्यांनी अचानक झाडे लावायला सुरुवात केली असं नाही. पर्यावरणाचं प्रदुषण वाढल्यानं त्यांचे मन विचिलित व्हायला लागलं. त्यावेळी त्यांनी एक नवी मोहिम सुरु केली. खिशात बिया आणि सायकलवर लहान रोपं घेऊन जिल्ह्यात दूरपर्यंत जायचे. जिथं रिकामी जागा दिसायची तिथं झाड लावायचे. त्यांनी सुरुवातीला तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील रेड्डिपल्ली या त्यांच्याच गावापासून सुरुवात केली. 

हे वाचा - ऐतिहासिक पद्मनाभस्वामी मंदिराचा खजिना राजघराण्याकडे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पर्यावरण प्रेमी असलेले दरिपल्ली रमैया हे झाडांची स्वत: काळजी घेतात. एखादं झाड वाळलं तर त्यांच्या मनाला वाईट वाटतं. आपलीच लहान मुलं असल्यासारखं ते झाडांना सांभाळतात. झाडांबद्दल त्यांनी इतकी माहिती मिळवली आहे की, आतापर्यंत त्यांनी 600 हून अधिक प्रकारच्या बिया आहेत. त्यांच्याकडे शिकलेल्या लोकांपेक्षाही याबाबतची माहिती जास्त आहे.

झाडांची निगा राखण्यासाठी आणि हिरवळ वाढवण्यासाठी रामैय्या यांनी आयुष्य खर्ची घातलं आहे. वृक्षारोपणासाटी त्यांनी आपली तीन एकर जमीनही विकली. त्या पैशातून बिया आणि रोपटे खरेदी केली. त्यांनी आतापर्यंत लावलेल्या झाडांची संख्या मोजणं कठीण आहे. फक्त झाडं लावून थांबले नाहीत तर त्यांची योग्य निगा राखून वाढवली.