अन् मोदी म्हणाले.. भारत की विजय! अच्छे दिन आएंगे! #ThisDayThatYear

गुरुवार, 16 मे 2019

असे होते गेल्या निवडणुकीतील चित्र 
भाजपप्रणित 'एनडीए' : 336 
कॉंग्रेसप्रणित 'यूपीए' : 60 
इतर : 147 

नवी दिल्ली : पाच वर्षं झाली त्या गोष्टीला.. 'इथे मित्रपक्षांचे कडबोळे घेऊनच सत्ता चालवावी लागते' या गृहीतकाला छेद देणारा निकाल भारतीय जनतेने दिला, त्याला आज बरोबर पाच वर्षं पूर्ण झाली. सकाळपासून निकाल लागण्यास सुरवात झाली.. 'ट्रेंड्‌स' पाहून विश्‍लेषक, राजकीय पक्ष आणि माध्यमांची बोटे तोंडात गेली आणि दुपारी 12 च्या सुमारास मोदींनी एक ट्‌विट केले.. 'अच्छे दिन आने वाले है!' 

'भारतामध्ये नरेंद्र मोदींची लाट आहे', यावर 2014 मध्ये आजच्याच दिवशी शिक्कामोर्तब झाले होते.

2014 ची लोकसभा निवडणूक अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरली. 1984 नंतर प्रथमच भारतामध्ये एखाद्या पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली होती. तसेच, उजव्या विचारसरणीचे सरकार प्रथमच इतक्‍या मजबूत स्थितीत आले होते. या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एकामागून एक राज्ये जिंकण्याचा सपाटा लावला. शेवटच्या थरापर्यंत जाऊन प्रभावी काम करणारी शहा यांची प्रचार यंत्रणा आणि जोडीला मोदी यांच्यासारखा हुकूमी एक्का हे समीकरण गेल्या पाच वर्षांत 'हिट' ठरले. काही राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का जरूर बसला; पण त्यामुळे मोदी-शहा यांचा विजयरथ पूर्णपणे थांबला असे झाले नाही. 

543 सदस्यांच्या लोकसभेमध्ये बहुमतासाठी 272 खासदारांची गरज असते आणि 2014 च्या निवडणुकीत भाजपने 282 जागा जिंकल्या. याशिवाय, मित्रपक्षांच्या जागा मिळून 'एनडीए'ने स्थिर बहुमताचे सरकार स्थापन केले. त्यावेळी भाजपने 427 जागा लढवून 282 जागांवर विजय मिळविले होते; तर कॉंग्रेसने लढविलेल्या 464 जागांपैकी केवळ 44 जागांवर जिंकता आले होते. 

असे होते गेल्या निवडणुकीतील चित्र 
भाजपप्रणित 'एनडीए' : 336 
कॉंग्रेसप्रणित 'यूपीए' : 60 
इतर : 147 

पाच वर्षांमध्ये भारताच्या राजकारणामधील चित्र नक्कीच बदलले आहे. मोदींचा करिष्मा पूर्णणे संपला नाही, हे खरे असले; तरीही राहुल गांधी यांनी नव्याने आक्रमक धोरण स्वीकारत सत्ताधारी भाजपच्या प्रचारयंत्रणेला धक्का दिला, हेही वास्तव आहे. 'राहुल गांधी 2.0' भाजपला रोखू शकतील का? की मोदी लाटेचा 'अंडरकरंट' पुन्हा एकदा राजकीय विश्‍लेषकांना तोंडघशी पाडणार? 

आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय मतदाराने त्याचा कौल दिला आहे. आता देशातील शेवटच्या काही मतदारसंघांमधील मतदान शिल्लक आहे. भारतीय जनतेचा निर्णय जवळपास ठरला आहे. तो कळेल आता पुढच्या आठवड्यात.. 23 मे रोजी! पुन्हा मोदी निवडून येणार की बदललेले राहुल गांधी भाजपला धक्का देणार? कळेलच काही दिवसांमध्ये.. 

23 मेच्या निकालाचे अपडेट्‌स, अचूक विश्‍लेषण आणि महाराष्ट्राचे सखोल वार्तांकन वाचण्यासाठी वाचत राहा eSakal.com

#ResultsWithSakal

निवडणूक निकाल जाहीर झाला, की देशाचे राजकीय चित्र काय असेल, असे तुम्हाला वाटते? लिहून पाठवा आमच्याकडे webeditor@esakal.com या ई मेल आयडीवर आणि सब्जेक्‍टमध्ये लिहा 'माझे विश्‍लेषण'!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This Day That Year Narendra Modi came into Power in India