ओमर अब्दुल्लांचा भाजपला टोला; DDC निवडणुकीच्या निकालावर दिली प्रतिक्रिया

टीम ई सकाळ
Wednesday, 23 December 2020

गुपकार आघाडीने 100 जागांवर विजय मिळवला असून 12 जागांवर आघाडी आहे. आतापर्यंत जवळपास 47 अपक्ष उमेदवारांना विजय मिळाला आहे. तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले असून यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लाह यांनी म्हटलं की, भाजप सरकार आता इथं लवकर विधानसभा निवडणुका घेणार नाही. इथं झालेल्या पराभवानंतर मला नाही वाटत की भाजप इथं लवकर विधानसभा निवडणुका घेईल. जर त्यांचा लोकशाहीवर विश्वास असेल तर आतापर्यंत निवडणुकांची घोषणा केली असती. आता आमच्याकडे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आणखी वेळ असेल. 

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले की,'आम्हाला हेसुद्धा स्वीकारलं पाहिजे की काही भागात आमच्या संघटनेत काही कमतरता आहेत. आम्ही काही जागांवर निवडणुका जिंकण्याची अपेक्षा करत होतो मात्र ते होऊ शकलं नाही.' जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सात पक्षांच्या गुपकार आघाडीने 280 पैकी 112 जागी आघाडी मिळवली आहे. तर भाजप 73 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासित प्रदेशात गुपकार आघाडीने 100 जागांवर विजय मिळवला असून 12 जागांवर आघाडी आहे. आतापर्यंत जवळपास 47 अपक्ष उमेदवारांना विजय मिळाला आहे. तर सहा जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. 

जम्मू आणि काश्मीर अपनी पार्टीने 11 जागांवर विजय मिळवला आहे. तर एका जागेवर आघाडी आहे. काँग्रेसला आतापर्यंत 22 जागांवर विजय मिळाला असून पाच जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

हे वाचा - तलाक बंद केलेला पक्षच पतीला घटस्फोटासाठी प्रोत्साहन देतोय; भाजप खासदाराच्या पत्नीचा आरोप

डीडीसीची निवडणूक प्रक्रिया 28 नोव्हेंबरला सुरु झाली होती. आठ टप्प्यात ही निवडणूक झाली. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा संपुष्टात आला होता. त्यानंतर काश्मीरमधील ही पहिलीच निवडणूक आहे. निवडणुकीत एकूण 280 जागा असून यापैकी 140 जम्मूत आणि 140 काश्मीरमध्ये आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ddc election omar-abdullah-comments-on-ddc-polls-results target bjp