'आयएनएस खांदेरी' पाणबुडीचे राजनाथसिंहांच्या हस्ते जलावतरण 

वृत्तसंस्था
Saturday, 28 September 2019

पाणतीरांचा मारा करण्यात ही आधुनिक पाणबुडी जास्त सक्षम असल्याची माहिती नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल जी. अशोक कुमार यांनी दिली. 'पी-17 ए' वर्गातील 'निलगिरी' या फ्रिगेटचे; तसेच विमानवाहू नौकेसाठीच्या ड्राय डॉकचे उद्‌घाटनही या वेळी करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. 

मुंबई : स्कॉर्पिन वर्गातील दुसऱ्या 'आयएनएस खांदेरी' या पाणबुडीचे जलावतरण संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते आज (शनिवार) मुंबईत जलावतरण करण्यात आले. 

पाणतीरांचा मारा करण्यात ही आधुनिक पाणबुडी जास्त सक्षम असल्याची माहिती नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल जी. अशोक कुमार यांनी दिली. 'पी-17 ए' वर्गातील 'निलगिरी' या फ्रिगेटचे; तसेच विमानवाहू नौकेसाठीच्या ड्राय डॉकचे उद्‌घाटनही या वेळी करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. 

'खांदेरी' आणि 'निलगिरी'च्या समावेशामुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. ड्राय डॉकच्या सुविधेमुळे 'विक्रमादित्य'सारख्या मोठ्या विमानवाहू नौकांची देखभाल-दुरुस्ती करणे सोपे होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा आणि विकास सर्व विभागांसाठी (सागर) यांच्या योजनेन्वये हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमानंतर राजनाथसिंह 'विक्रमादित्य'वर जाणार असून, संपूर्ण दिवस सागरावर काढणार आहेत. पाणबुडी किंवा जहाजांची बांधणी हे अवघड आणि किचकट काम असते, त्यात आव्हानही असते; पण आमच्या तंत्रज्ञांनी ते पेलले. 

'खांदेरी' ही आधुनिक पाणबुडी असून, ती पाण्यातून किंवा सागराच्या पृष्ठभागावरून पाणतीर आणि ट्यूबमधून सोडल्या जाणाऱ्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचा प्रभावीपणाने मारा करू शकते. तिची बांधणी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) मुंबईत जानेवारी 2017 मध्ये सुरू केली होती. स्कॉर्पिन वर्गातील 'कलवारी' या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण मोदी यांच्या हस्ते डिसेंबर 2017 मध्ये झाले होते. 'मेक इन इंडिया'चे हे उत्तम उदाहरण असल्याचे गौरवोद्‌गार मोदींनी तेव्हा काढले होते. 'कलवारी' ही भारतीय नौदलाची पहिली पाणबुडी असून, ती आठ डिसेंबर 1967 रोजी नौदलात दाखल झाली होती. तीन दशकांच्या सेवेनंतर 31 मे 1996 रोजी तिला निवृत्त करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defence Minister Rajnath Singh commissions the second Kalvari-class Submarine INS Khanderi