esakal | VIDEO - राफेल विमानांचे ‘सर्व धर्म पूजे’ने स्वागत; चीनला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Rafale

भारताची हवाई ताकद वाढविणारी राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज अंबाला येथील तळावर एका दिमाखदार सोहळ्यात भारतीय हवाई दलात दाखल झाली. 

VIDEO - राफेल विमानांचे ‘सर्व धर्म पूजे’ने स्वागत; चीनला इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाला - भारताची हवाई ताकद वाढविणारी राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज अंबाला येथील तळावर एका दिमाखदार सोहळ्यात भारतीय हवाई दलात दाखल झाली. पूर्व लडाख भागात चीनबरोबर वाद सुरु असतानाच ही विमाने दाखल झाली असल्याने सैन्य दलांचे मनोधैर्य अधिक उंचावले आहे. राफेल विमाने हवाई दलाच्या ‘गोल्डन ॲरोज्‌’ स्क्वाड्रनमध्ये दाखल झाली आहेत.

भारताने फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदीचा करार केला असून पहिल्या टप्प्यात पाच राफेल विमाने २९ जुलैला भारतात दाखल झाली होती. ती विमाने आज अधिकृतरित्या हवाई दलाच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथसिंह, सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया यांच्याबरोबरच फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी भाषण करताना राजनाथसिंह यांनी चीनला कडक संदेश दिला.

‘सीमेवर तणावाचे वातावरण तयार केले गेले असताना राफेल विमान हवाई दलात दाखल होण्याची घटना महत्त्वाची आहे. भारताच्या सार्वभौमत्वावर डोळे वटारणाऱ्यांना हा कडक इशारा आहे. बदलत्या काळानुसार आपणही सज्ज राहिले पाहिजे, हे आम्हाला चांगले समजते. देशाच्या सुरक्षेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वोच्च प्राधान्य देत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे,’ असे राजनाथसिंह यावेळी म्हणाले.

हवाई दलाच्या परंपरेनुसार राफेल विमानांचे ‘सर्व धर्म पूजे’ने, म्हणजेच पाण्याचे फवारे मारुन स्वागत करण्यात आले. यावेळी हवाई दलाच्या विमानांनी चित्तथरारक कवायतीही केल्या. तसेच, स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ विमानांनी आणि ‘सारंग’ हेलिकॉप्टर पथकानेही कवायती केल्या. फ्रान्समधील डसॉल्ट एव्हीएशन या कंपनीने तयार केलेले राफेल लढाऊ विमान हे अत्याधुनिक आणि बहुउद्देशीय आहे. अचूक हल्ले आणि सर्वाधिक सुधारित तंत्रज्ञानासाठी ते ओळखले जाते.

भारताने फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार केल्यानंतर चार वर्षांनंतर पहिली तुकडी जुलैमध्ये भारतात आली होती. आणखी पाच विमाने भारताच्या ताब्यात आली आहेत, मात्र हवाई दलाच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी ती अद्याप फ्रान्समध्येच असून तीन नोव्हेंबमध्ये भारतात दाखल होणार आहेत. भारताला सर्व ३६ विमाने २०२१ च्या अखेरीपर्यंत मिळणे अपेक्षित आहे. या ३६ पैकी ३० विमाने लढाऊ, तर सहा विमाने प्रशिक्षण विमाने असतील.

फ्रान्सच्या जागतिक लष्करी पुरवठा साखळीमध्ये भारतातील संरक्षण क्षेत्राला समाविष्ट करून घेण्यासाठी फ्रान्स कटिबद्ध आहे. राफेल विमाने भारतात दाखल झाल्याने दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध अधिक दृढ झाले आहेत.
- फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण मंत्री, फ्रान्स 

घातक क्षेपणास्त्रांचा ताफा
राफेल विमानांच्या भात्यात मीटिऑर हे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नजरेच्या टप्प्यात न दिसणाऱ्या लक्ष्यावरही ते अचूक मारा करू शकते. याशिवाय ‘स्काल्प’ हे क्षेपणास्त्रही राफेलवर सज्ज असणार आहे. राफेल विमानांची आजची पहिली तुकडी अंबाला हवाई तळावर तैनात असेल, तर दुसरी तुकडी पश्‍चिम बंगालमधील हरिमारा तळावर तैनात केली जाणार आहे.