शस्त्र पूजा करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला दिला इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

आमचे जवान कोणत्याही परिस्थितीत भारताची एक इंचही जमीन दुसऱ्याच्या हाती जावू देणार नाहीत

नथुला पास- चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सिक्किममध्ये भारतीय लष्कराबरोबर दसरा साजरा केला. राजनाथ सिंह हे रविवारी (दि.25) सकाळी दार्जिलिंग येथील सुकना सुकमा वॉर मेमोरियलवर पोहोचले आणि त्यांनी तिथे 'शस्त्र पूजा' केली. 

'भारत-चीनच्या सीमेवरील तणाव संपुष्टात यावा, अशी भारताची इच्छा आहे. शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. परंतु, कधी-कधी वाईट घटना घडतात. मला पूर्ण विश्वास आहे की, आमचे जवान कोणत्याही परिस्थितीत भारताची एक इंचही जमीन दुसऱ्याच्या हाती जावू देणार नाहीत,' असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. यावेळी राजनाथ सिंह यांनी सिक्किम येथे बीआरओकडून तयार करण्यात आलेल्या एक्सल रस्त्याचे ई-उद्घाटन केले. 

राजनाथ सिंह यांनी सकाळी दार्जिलिंग येथील सुकना वॉर मेमोरियल येथे 'शस्त्र पूजा' केली. यावेळी भारतीय लष्कराचे प्रमूख मुकुंद नरवणे हेही उपस्थित होते. तत्पूर्वी राजनाथ सिंह यांनी वॉर मेमोरियलवर श्रद्धांजली अर्पण करत वीर जवानांचे स्मरण केले. 

त्याआधी राजनाथ सिंह यांनी टि्वट करुन देशवासियांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या पवित्र दिवशी मी सिक्किम येथील नथूला येथे जाऊन भारतीय लष्करातील जवानांची भेट घेणार असून तिथे शस्त्र पूजनातही सहभागी होणार आहे, असे सांगितले. ते विशेष विमानाने लष्कर प्रमुखांसह सिक्किमला आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Defence minister Rajnath Singh Shastra Pooja With Soldiers Near Lac In Sikkim On Dussehra