दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
Summary

करोनामुळे आधीच जीवनाची धास्ती असलेल्या वृद्धआंचे आयुष्य आणखी काही वर्षांनी कमी होओ आणि जीवन विकारयुक्त होओ, इथं केंद्र व राज्य अशी दोन सरकारे असूनही ती डोळ्याला झापडं लावून बसलेली आहेत.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून राजधानी पहिला क्रमांक सोडायला तयार नाही, मग त्यामुळे कित्येकांना दमा होओ, फुफ्फुसाचे विकार होओ, श्वसनाचा त्रास होओ, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थांचे आरोग्य बिघडो, करोनामुळे आधीच जीवनाची धास्ती असलेल्या वृद्धआंचे आयुष्य आणखी काही वर्षांनी कमी होओ आणि जीवन विकारयुक्त होओ, इथं केंद्र व राज्य अशी दोन सरकारे असूनही ती डोळ्याला झापडं लावून बसलेली आहेत. त्यामुळे दिल्लीकर बेजार झाला नाही, तरच नवल.

शुक्रवारी दिल्लीने प्रदूषणाची अत्यंत धोकादायक अशी 500 मायक्रोग्रामची पातळी गाठली. हवामानाच्या निर्देशांकानुसार दर क्यूबिक मीटरला प्रदूषणाचे 1 ते 50 असे प्रमाण असेल, तर ते चांगले व सुरक्षित समजले जाते. 51 ते 110 असेल, तर समाधानकारक, 102 ते 200 असेल तर सौम्य, 201 ते 300 असेल तर वाईट, 301 ते 400 असेल तर अतिवाइट व 401 ते 500 असेल तर अत्यंत धोकादायक असे समजले जाते. दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार गुरूवारी सायंकाळपर्यंत हे प्रमाण एका क्यूबिक मीटरला 246 झाले. फुफ्फुसासाठी ते धोकादायक होय. दिल्लीशेजारी असलेल्या फरीदाबादमध्ये (454), ग्रेटर नोयडा (410), गाझियाबाद (438), गुरूग्राम (473), नोयडा (456) असे प्रमाण होते.

यंदा दिवाळीत फटाक्यांवर बंदी होती. तरीही लोक अय़कायाला तयार नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जागोजागी झालेल्या फटाकेबाजीमुळे दिल्लीची हवा धूसर दिसू लागली. सूर्य दर्शन होत नव्हते. 28 सप्टेंबर व 4 नोव्हेंबर दरम्यान बंदीचे उल्लंघन करणाऱ्या 210 लोकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. 143 जणांना अटक करण्यात आली. 489 किलो फटाके जप्त करण्यात आले. पोलिसांकडे नियम उल्लंघन करणाऱ्यांबाबतच्या 1143 तक्रारी आल्या होत्या.

घरात हवा शुद्धीकरण यंत्र (प्यूरीफायर) चालू केले, तरी त्याचे प्रदूषणाचे प्रमाण अडीचशेच्या खाली जात नव्हते. याचा अर्थ घऱाघराला प्रदूषित हवेने व्यापले. कितीही काळजी घेतली, मुखपट्टी लावली, तरी श्वसनक्रियेत फफ्फुसावर होणारा परिणाम कुणीही रोखू शकले नाही. प्रदूषण वाढू लागले, की दिल्ली सरकार बांधकामाची कामे थांबविते. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालविलेल्या सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पांच्या बांधकामाला कोण थांबविणार तिथं दिवसभर टनावारी धूळ हवेत पसरते. परिसर धूसर होतो. या बांधकामामुळे येत्या जानेवारीत गेली सत्तर वर्षे राजपथावर होणारा प्रजासत्ताक दिन पुढील वर्षी साजरा होण्याची शक्यता नाही. त्यासाठी सरकारला पर्यायी स्थळ निवडावे लागेल.

दिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
दिल्लीच्या जीवघेण्या प्रदूषणावरूनही राजकीय फटाके जोरात

कधीकधी दिवसादेखील राष्ट्रपती भवन, नॉर्थ व साउथ ब्लॉक, संसद भवन धूळ व धुक्यात लुप्त होते. हिवाळा आला, की सातत्याने भर पडते ती हरियाना, पंजाब व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची तृणजाळणी व त्यापासून निघणाऱ्या धुराचे दिल्लीवर पसरणारे दाट सावट याची. गेली दहा-बारा वर्ष त्याबाबत पर्यावरण तज्ञांनी वारंवार इशारे देऊन ही काही फरक पडलेला नाही. रूग्णलयांकडे श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

दिल्लीत हिवाळ्याची सुरूवात नोव्हेंबराच्या सुरूवातीपासून होते व तो जानेवारीच्या अखेरपर्यंत टिकतो. गेल्या वर्षी दिल्ली सरकारने वाहनांच्या बाबतीत ऑड अँड इव्हन हा लागू केलेला नियम अद्याप लागू करण्यात आलेला नाही. प्रदूषण शोषून घेणारी यंत्रेही दिल्लीतील काही भागातून उभारण्यात आली, तथापि, त्यांचा काही परिणाम झालेला नाही. गेल्या वर्षी तर आनंदविहार उपनगरात प्रदूषण पातळी 1000 वर गेली, तेव्हा त्याची नोंद करणारे यंत्र कोलमडून पडले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहाणीनुसार, पंजाब, हरियाणाच्या शेतात यंदा तृण जाळण्याच्या तब्बल पाच हजार घटना घडल्या. दिल्लीच्या प्रदूषणातील त्याचे 2 नोव्हेंबर रोजी असणारे टक्के प्रमाण 6 नोव्हेंबर रोजी 41 टक्क्यांवर जाऊन पोहोचले. गेली काही वर्षे तृण जाळण्याबाबत वेगवेगळे उपाय सुचविण्यात आले. त्यापासून खत अथवा अन्य उपयोगी गोष्टींची निर्मिती होऊ शकेल काय, याबाबतही काही प्रयोग करण्यात आले. तथापि, यावर अद्याप रामबाण उपाय निघालेला नाही. ग्लासगोमध्ये कॉप 26 ची शिखर परिषद चालू असताना, हरितवायुंचे उत्सर्जन 1.5 टक्क्यावर आणण्याचा निर्धार व्यक्त होत असताना व पंतप्रधान मोदी महत्वाकांक्षी कार्यक्रम जगापुढे ठेवित असताना दिल्लीची दशा मात्र दयनीय झाली.

दिल्लीतील वनराई, रस्ते यांच्यावर पसरलेली धूळ साफ करण्यासाठी दिल्ली सरकारने पाण्याच्या फवाऱ्यांचे तब्बल 114 टँकर्स दिल्लीच्या रस्त्यारस्त्यांवरून फिरविले. त्यामुळे काही प्रमाणात धूळ बसली. हवामानाच्या संदर्भात माहिती देणाऱ्या इशारा प्रणालीनुसार, दिल्लीकडे पश्चिमोत्तर दिशेने येणाऱ्या वाऱ्यानेही प्रदूषणात भर टाकली.

दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या सफाईची मोहीम गेले दहा पंधरा वर्षे सुरू आहे. तथापि, या नदीची गटारगंगा होण्याचे थांबलेले नाही. उलट, गेल्या आठवड्यात तिच्या पाण्यातील आमोनियाचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत गेल्याने सोनिया विहार, भागीरथी, वझीराबाद, चंद्रवाल व ओखला या उपनगरातील पुरवठा काही वेळ खंडीत करण्याची वेळ आली. यमुनेच्या प्रवाहात काही भागात प्रचंड जलपर्णी दिसते. तिच्या तीराने जाताना दिसतो तो फक्त पांढरा तरंगणारा फेस. दिल्लीतील घाटांवर छट पूजेला बंदी करण्यात आली असून, गेल्या तीन चार वर्षात गणपती उत्सवानंतर व बंगाल्यांच्या दुर्गापूजा उत्सवानंतर यमुनेत मूर्तींचे विसर्जन होणे जवळजवळ बंद झाले आहे. यमुनेचे प्रदूषण कमी व्हावे, म्हणून काही कारखानेही हलविण्यात आले. तथापि, तिच्या प्रदूषणात लक्षणीय घट झालेली नाही. एकीकडे हवेतील प्रदूषण व दुसरीकडे यमुनेचे प्रदूषण यामुळे दिल्लीकरांची निदान येती काही वर्षे तरी सुटका नाही. याला काही प्रमाणात दिल्लीकरही जबाबदार आहेत. येथे होणाऱ्या पूजा आदीनंतर लाखो टन फुलांच्या माळा लोक नदीत सोडतात. त्यावर निर्बंध घालण्यात सरकारला यश आलेले नाही. कारण, कायदा हा मोडण्यासाठीच केलेला असतो, असा दिल्लीकरांचाच नव्हे, तर देशातील साऱ्या जनतेचा व विशेषतः राजकीय पक्षांचा समज झाला आहे. त्यामुळे, देशातील चांगल्या चांगल्या शहरांची वाट लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com