मतदानानंतर २४ तासांनी अंतिम टक्केवारी जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

दिल्लीत मतदान होऊन २४ तास झाल्यावरही आयोगाने मतदान टक्केवारी गुलदस्तात ठेवली. हा संशयास्पद प्रकार ठरला. आम आदमी पक्षाने यावर जाहीर शंका घेताना, मतदान यंत्रांत छेडछाड होत असल्याची शंका उपस्थित केली.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने आज सायंकाळी उशिरा जाहीर केले. गेल्या वेळच्या २०१५ मधील मतदानापेक्षा यंदा सुमारे पाच टक्के मतदान कमी झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल (ता. ८) मतदानाची वेळ संपल्यावर २४ तास उलटून गेल्यावर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. आयोगाकडून नेहमी मतदान टक्केवारी मतदान झाल्यावर काही वेळातच जाहीर होते. मात्र या वेळी दिल्लीत मतदान होऊन २४ तास झाल्यावरही आयोगाने मतदान टक्केवारी गुलदस्तात ठेवली. हा संशयास्पद प्रकार ठरला. आम आदमी पक्षाने यावर जाहीर शंका घेताना, मतदान यंत्रांत छेडछाड होत असल्याची शंका उपस्थित केली. त्यावरही आयोगाने वरवरचा खुलासा करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. अखेर फारच वाद वाढल्यावर व त्याचबाबत संशयाची सुई भाजपकडे वळत असल्याचे लक्षात येताच आयोगाकडून  ६२.५९ टक्‍क्‍यांची टक्केवारी अखेर जाहीर करण्यात आली. 

रात्री उशिरापर्यंत माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते. अचूक माहिती येण्यास वेळ लागल्याने डेटा एन्ट्रीला वेळ लागला, असा खुलासा दिल्लीचे मुख्य निवडणूक आयुक्त रणबीरसिंह यांनी केला. सर्वाधिक ७१.६ टक्के मतदान बल्लीमारन मतदारसंघात, तर सर्वांत कमी मतदान दिल्ली कॅंटोन्मेंटमध्ये ४५.४ टक्के झाल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Assembly Election Final percentage announced 24 hours after voting