esakal | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

दिल्लीच्या विकास, प्रगती व सुधारणेबाबतचे शीला दीक्षित यांचे योगदान संस्मरणीय आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सलग तीन वेळेस भूषविण्याचा विक्रम केलेल्या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित (वय 81) यांचे आज दुपारी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निजामुद्दीन पूर्व येथील निवासस्थानी नेण्यात आले असून, उद्या (ता. 21) दुपारी निगमबोध स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. शीला दीक्षित यांच्यामागे मुलगा आणि माजी खासदार संदीप दीक्षित व विवाहित कन्या लतिका असा परिवार आहे. 

शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. 
शीला दीक्षित यांची प्रकृती आज सकाळी अचानक खालावल्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. तेथे तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले. परंतु दुपारनंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि तीन वाजून 55 मिनिटांनी त्यांचे निधन झाले. 

राजधानी असूनही ज्या दिल्लीत विजेची टंचाई भासत असे, ती समस्याच त्यांनी दूर करून दिल्लीकरांचा दुवा मिळवला होता. त्यांच्या अखेरच्या दिवसांत कॉंग्रेस महासमितीशी त्यांचे अनेक मुद्द्यांवर मतभेद झाले होते. एकप्रकारे त्या शेवटपर्यंत सक्रिय राहिल्या असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

शीला दीक्षित यांना श्रद्धांजली वाहताना कोविंद यांनी, शीला दीक्षित यांनी केलेल्या दिल्लीच्या कायापालटाचा उल्लेख करून त्याचे श्रेय त्यांना दिले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही, "शीला दीक्षित यांच्या कामगिरीबद्दल दिल्लीनिवासी त्यांना नेहमी स्मरणात ठेवतील,' अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहिली. शीला दीक्षित यांच्या निधनामुळे आपल्याला दुःख झाल्याचे सांगून राहुल गांधी यांनी, त्यांच्याशी आपले वैयक्तिक पातळीवर अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचे निधन ही आपली व्यक्तिगत हानी असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेस पक्षानेही त्या एक निष्ठावान कॉंग्रेस नेत्या होत्या आणि त्यांची कॉंग्रेस पक्षाशी बांधिलकी ही निर्विवाद होती असे म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनीही त्यांच्या निधनाची बातमी धक्कादायक असल्याचे म्हटले.

"राजकीय विरोधक असूनही त्यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे संबंध होते आणि दिल्लीच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम कुणीही विसरू शकणार नाही,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दिल्लीच्या विकास, प्रगती व सुधारणेबाबतचे शीला दीक्षित यांचे योगदान संस्मरणीय आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

loading image
go to top