दिल्लीकरांची दिवाळी प्रदूषणमुक्त - जावडेकर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

‘आरे’वृक्षतोडीवर मतप्रदर्शन टाळले
मुंबईत ‘आरे’तील वृक्षतोडीवरून चोहोबाजूंनी टीका सुरू असताना जावडेकर यांनी यावर मतप्रदर्शन करण्याचे टाळले. ‘सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला असल्याने यावर मी बोलणे योग्य ठरणार नाही,’ असे ते म्हणाले. एक झाड तोडल्यास पाच झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे महत्त्वाचे असल्याची टिप्पणीही केली.

नवी दिल्ली - दिल्लीकरांच्या दिवाळीवर प्रदूषणाचे सावट पडू नये, यासाठी सरकारने कंबर कसली असून, हवेची शुद्धता राखण्यासाठी विशेष तपासणी गटांची नियुक्ती, पिकांचे अवशेष जाळण्यातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पंजाब, हरियानाला मदतीसारख्या उपायांची घोषणा केंद्राने केली आहे.

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत या उपाययोजनांची माहिती दिली. दिल्लीत वायुप्रदूषण होऊ नये, यासाठी नेमलेल्या विशेष देखरेख गटाने छापे घालण्यास सुरवात केली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंत्रालयाने ४७ विशेष गटांची नियुक्ती केली आहे. हे गट राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अचानक तपासणी करतील, असे जावडेकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला लागून असलेल्या दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाना आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांची बैठकही केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांनी पुढील आठवड्यात बोलावली आहे. या बैठकीत केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगताना जावडेकर म्हणाले की, हरियाना आणि पंजाबमध्ये पिकांचे अवशेष जाळण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा उपद्रव कमी झालेला नाही. तो रोखण्यासाठी या दोन्ही राज्यांना केंद्राकडून ११२० कोटी रुपये देण्यात आले आहेत. पिकांचे अवशेष काढण्यासाठी  १८ हजार यंत्रांचे वाटप करण्यासारख्या उपाययोजनांसाठी हा निधी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Diwali Pollution free prakash javadekar