शेतकऱ्याची दिलदारी; शेतमजूर कामावर येण्यासाठी काढली विमानाची तिकिटे 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू झाले त्या वेळी दिल्लीतील मशरुम उत्पादक शेतकऱ्याने त्याच्या दहा मजुरांना विमानाने बिहारला त्यांच्या गावी पाठविले होते.

नवी दिल्ली- कोरोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू झाले त्या वेळी दिल्लीतील मशरुम उत्पादक शेतकऱ्याने त्याच्या दहा मजुरांना विमानाने बिहारला त्यांच्या गावी पाठविले होते. आता त्‍याने त्यांच्यासह अन्य दहा स्थलांतरित मजुरांना पुन्हा कामावर बोलावले असून त्यांची परतीची विमान तिकिटेही काढली आहेत. 

पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या वापराची वेळ येऊ नये; उद्घाटनावेळी...

दिल्लीतील या दिलदार शेतकऱ्याचे नाव पप्पनसिंह असून त्याच्याकडे हे मजूर गेल्या २० वर्षांपासून काम करीत आहेत. लॉकडाउनमुळे ते घरी गेले आहेत. मात्र आता मशरुमचा हंगाम सुरू होत आहे. त्यासाठी पप्पनसिंहने त्यांना परत कामावर बोलावले आहे. त्यांच्या परतीच्या तिकिटासाठी त्याने एक लाख रुपये खर्च केले आहेत. 

बिहारहून २० पैकी दहा मजूर प्रथमच विमानाने प्रवास करणार असून गुरुवारी (ता.२७) ते सर्वजण दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरतील. दिल्लीतील टिगीपूर गावात पप्पनसिंहचे शेत असून मजूर आल्यानंतर तेथे मशरूम पेरणीला सुरुवात होणार आहे. 

विमानाने प्रवासासाठी मजूर उत्सुक आहेत, असे बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या नवीन राम याने दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. त्याने मे महिन्यात विमान प्रवासाचा पहिला अनुभव घेतला असल्याने या वेळी भीती वाटत नाही, असेही तो म्हणाला. लॉकडाउनमुळे दिल्लीत अडकलेल्या ज्या दहा मजुरांना पप्पनसिंहने मे महिन्यात विमानाने गावी पाठविले त्यापैकी एक नवीन आहे. नवीन म्हणाला, ‘‘दिल्लीत कामावर जाण्यासाठी आम्ही रेल्वेची तिकिटे काढण्याचा प्रयत्न करीत होतो. पण पुढील दीड महिना रेल्वे सुरू होणार नसल्याचे समजले. जर रेल्वेसाठी थांबलो तर यंदाच्या हंगामात मशरुमची शेती करण्यासाठी वेळेत पोचणे शक्य नसल्याने आम्ही मालकाला कळविले. त्‍याने आमच्यासाठी विमानाची तिकिटे काढत असल्याचे सांगितले.’’ 

काँग्रेस नेत्यांच्या पत्रानंतर सोनिया गांधींनी घेतला मोठा निर्णय

‘मजूर माझ्या कुटुंबातील सदस्यच’ 

शेतमजुरांसाठी विमानाची तिकिटे काढल्‍याबाबत विचारले असता पप्पनसिंह म्हणाला, ‘‘हे मजूर माझ्याकडे १५ ते २५ वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांना मी माझ्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागवतो. मी यंदा मशरुमचे पीक कमी प्रमाणात घेणार असल्याने दिल्लीतील स्थानिक मजुरांना कामावर ठेवता आले असते. पण माझ्या मजुरांबरोबर भावनिक नाते तयार झाले असल्यानेच मी त्यांच्यासाठी विमानाची तिकिटे काढली आहेत. शेतातील कामामुळे त्यांना उदरनिर्वाहाची चिंता राहणार नाही.’’ मे महिन्यात दहा मजुरांना बिहारमधील गावी जाण्यासाठी पप्पनसिंहने ६८ हजार रुपये खर्च करुन विमानाने त्यांना पाठविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi farmer generosity Plane tickets booked for agricultural laborers