दिल्लीकर चालविणार शेकडो योगवर्ग; केजरीवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind kejriwal

दिल्लीकर चालविणार शेकडो योगवर्ग; केजरीवाल

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शेकडो विनामूल्य योगवर्गांना परवानगी देण्याचे केंद्र सरकारने नाकारले तरी दिल्लीकर हे वर्ग बंद पडू देणार नाहीत, असा विश्वास दिल्ली सरकारने व्यक्त केला आहे. योगशिक्षण देणाऱ्या सुमारे पावणे सहाशे प्रशिक्षकांच्या वेतनासाठी ७२७७९७२७७९ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश पाठवून पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी दानशूर दिल्लीकरांना केले आहे.

नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिल्लीतील विनामूल्य योगशिक्षण वर्गांच्या फाईलवर सही करण्याचे नाकारले. त्यामुळे या महिन्यात सुरवातीचे दोन दिवस हे वर्ग झाले नाहीत. मात्र नियमित योगशिक्षण घेणाऱ्या हजारो दिल्लीकरांनी केंद्राच्या या सूडबुद्धीच्या कारवाईवर रोष व्यक्त करत योगवर्ग चालू ठेवण्याचे आवाहन दिल्ली सरकारला केले. केजरीवाल यांनी त्यानंतर जनसहभागातून योगशिक्षण देणार अशी घोषणा केली.

प्रसंगी भीक मागू पण योगशिक्षकांचे वेतन रखडणार नाही, असा विश्वास त्यांनी दिला. केंद्राने याबाबतच्या आर्थिक तरतुदीला मंजुरी नाकारल्यावर दिल्ली सरकारने दानशूरांच्या मदतीने प्रशिक्षण जारी ठेवण्याचा मार्ग शोधला आहे. केंद्राकडून त्यासाठीही आडकाठी येत नाही तोवर योगशिक्षकांचे वेतन व हजारो योगसाधकांचे प्रशिक्षण चालू राहील, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. योगाचे वर्ग बंद होऊ देणार नाहीत, असा निर्धार केल्याचे सांगून केजरीवाल म्हणाले ली, की नायब राज्यपालांनी देवदत्तप्रमाणे जनतेवर बाण सोडले. पण आम्ही (दिल्ली सरकारने) सिद्धार्थासारखे चिकाटीने योगाचे वर्ग चालू ठेवले.

‘इच्छुकांनी व्हॉट्सअप मेसेज करावा’

अरविंद केजरीवाल यांनी सांगितले, की दोन दिवस वर्ग बंद होता. उर्वरित काळात योगवर्ग रोज सकाळी आणि संध्याकाळी सुरू आहेत. हे पुण्याचेच काम आहे. दिल्लीतील अनेकांना योगदान द्यायचे आहे आणि तसे संदेश सरकारकडे आले आहेत.दिल्ली सरकारच्या वतीने योग शिक्षकांना दर महिन्याला प्रत्येकी १५ हजार रुपये देण्यात येतात. ज्यांना एक ते-तीन शिक्षकांचा पगार देण्याची इच्छा आहे, त्यांनी व्हॉट्सअॅपवर ७२७७९७२७७९ या क्रमांकावर मेसेज करावा. आम्ही या महिनाअखेरीस शिक्षकांची नावे जाहीर करू. या पुण्यकार्यात दिल्लीतील जनता सहकार्य करेल, असाही विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Arvind Kejriwaldelhiyoga