esakal | Delhi: गांधीसमर्थक विरुद्ध ‘जी-२३’ आमनेसामने
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

दिल्ली : गांधीसमर्थक विरुद्ध ‘जी-२३’ आमनेसामने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १६) कार्यकारिणीच्या बैठकीत गांधी कुटुंब समर्थक विरुद्ध जी-२३ गटातील असंतुष्ट नेते असा मुकाबला झडण्याची चिन्हे आहेत.

पक्षसंघटनेतील विस्कळितपणा आणि नेतृत्वाचा अभाव यावर असंतुष्ट मानल्या जाणाऱ्या जी-२३ गटाचे नेते सातत्याने बोलत आहेत. पंजाबमधील मुख्यमंत्री बदलाचे नाट्य आणि राहुल गांधी, प्रियांका गांधींनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त केलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांची राजीनाम्याची घोषणा यावर हा गट आणखी आक्रमक झाला आहे. या गटाचे सदस्य असलेल्या कपिल सिब्बल यांनी अलीकडेच नेतृत्वाच्या निष्क्रियतेवरून तोफ डागताना कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती.

हेही वाचा: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

त्यावरून सिब्बल यांच्या घरावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला हल्ला आणि त्यांच्या वाहनाची केलेली मोडतोड हे प्रकरणही पक्षात चांगलेच गाजले. याचा तीव्र शब्दात निषेध करताना, चौकशीची आणि दोषींवर अध्यक्षा सोनिया गांधींनी कारवाई करावी, अशी मागणी या गटातील नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा यांसारख्या नेत्यांनी केली होती. तर, पी. चिदंबरम यांनीही या घटनाक्रमावर तीव्र चिंता व्यक्त करून सूचक नाराजीही बोलून दाखविली होती.

वेणुगोपाल यांना पुन्हा टाळले

राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये राहुल, प्रियांका यांच्यासोबतच ए. के. अॅन्टनी, मल्लिकार्जुन खर्गे आणि गुलाम नबी आझाद होते. सर्वसाधारणपणे पक्षाच्या अशा औपचारिक भेटीमध्ये संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा समावेश असतो. परंतु, त्यांच्या ऐवजी आझाद सोबत नेण्यात आलेे. मागील वर्षी जी-२३ गटाने लिहिलेल्या पत्रावरून वाद उद्भवल्यानंतर सोनिया गांधींनी या गटातील नेत्यांची बैठक घेतली असताना वेणुगोपाल यांना निमंत्रण टाळले होते.

loading image
go to top