Aurangabad: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण
प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

औरंगाबाद : शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या एन-२ भागातील प्रा. राजन शिंदे यांचा खून होऊन तीन दिवस उलटले तरी पोलिसांच्या हाती अजूनही ‘क्लू’ सापडलेला नाही. याच प्रकरणात गुरुवारी (ता.१४) विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) एका मानसशास्त्र अभ्यासकाची मदत घेण्यात आली आहे. तर एसआयटीचे दुसरे पथक तपासणीसाठी प्रा. शिंदे यांच्या गावी म्हणजेच देऊळगाव राजाला रवाना झाले होते.

एसआयटीचे एक पथक गुरुवारी (ता.१४) देऊळगाव राजाला रवाना झाले होते. संबंधित पथकाकडून मृत प्रा. शिंदे यांच्याशी संपर्कात असलेल्या देऊळगाव राजा येथील निकटवर्तीयांसह संबंधित असलेल्यांची चौकशी करण्यात येत आहे. मृत प्रा. शिंदे याचा मुलगा हा राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या प्रथम वर्षात शिकतो. खुनाच्या पहिल्या दिवसापासून तो पोलिसांशी ‘हातचे राखून’ बोलत आहे. यामध्ये मानसशास्त्राचे काही पैलू दडलेत का? हे तपासण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मानसशास्त्र अभ्यासकांची मदत घेतली आहे.

या मानसशास्त्र अभ्यासकांच्या उपस्थितीत डॉ. शिंदे यांच्या खुनाशी संबंधितांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अभ्यासकाच्या अभिप्रायानंतर पोलिस यंत्रणेकडून त्या पद्धतीने तपास होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. खुनानंतर चौथ्या दिवशी पोलिसांनी मृत शिंदे यांच्या निकटवर्तीयांची चौकशी केली, तसेच त्यांच्या परिचित व्यक्तींचे जबाब घेत नोंदी घेतल्या. मात्र, त्यातूनही अद्याप पोलिसांना क्लू मिळालेला नव्हता.

मोबाइल डाटावरही काम सुरू

शिंदे खून प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांनी ज्या ज्या लोकांना माहिती देण्यासाठी मोबाईलचा वापर केला, यासोबतच खुनादरम्यान हजर असलेल्या निकटवर्तीयांच्या मोबाईल डाटावर काम करण्यात येत आहे. या प्रकरणात गेल्या आठ दिवसांत झालेल्या मोबाइलवरून केलेल्या कॉलचीही माहिती काढण्यात येत आहे.

दोन अधिकाऱ्यांचा समावेश

पथकात उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे तसेच शहर पोलिस दलातील सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे यांचा समावेश करण्यात आला आहे. महिलेशी संवाद साधण्यासाठी तसेच सायबरवर काम करण्यासाठी या अधिकाऱ्यांची मदत होणार आहे.

टॅग्स :Aurangabad Newsmurder