यमुना स्वच्छतेवरून ‘आप’-भाजप आमनेसामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यमुना स्वच्छतेवरून ‘आप’-भाजप आमनेसामने
यमुना स्वच्छतेवरून ‘आप’-भाजप आमनेसामने

यमुना स्वच्छतेवरून ‘आप’-भाजप आमनेसामने

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये रसायनयुक्त पाण्याने वाहणाऱ्या यमुना नदीच्या सफाईसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाच वर्षासाठीचा नवा कृती आराखडा आज जाहीर केला. यावरून आम आदमी पक्ष आणि भाजप पुन्हा आमने-सामने आले असून भाजपने केजरीवाल यांच्या ताज्या निर्णयावर 'तीच पटकथा पण मुख्यमंत्री केजरीवाल परत सादर करत आहेत,’ असा टोला लगावला.

केजरीवाल हे भोळाभाबडा चेहरा करून समोर येतात. यापूर्वी दिलेली आश्वासनेच पुन्हा देतात. त्यांचा हा चलाखपणा समस्त दिल्लीकरांना आता समजून चुकला आहे, अशी टीका ज्येष्ठ भाजप नेते श्‍याम जाजू यांनी केली.दिल्लीच्या पुढील निवडणुकीपर्यंत यमुना पूर्ण स्वच्छ झालेली असेल व फेब्रुवारी २०२५ पर्यंत यमुनेत आपण दिल्लीकरांबरोबरच सत्तारूढ पक्षाच्या नेत्यांसह अंघोळ करू असे आव्हानवजा वक्तव्य केजरीवाल यांनी केले. त्यावरही भाजपने निशाणा साधला आहे.

केजरीवाल यांनी, सांगितले की यमुनेच्या दिल्लीतून वाहणाऱ्या प्रवाहामध्ये मैलापाण्याचे चार मोठे नाले थेट मिसळतात. दिल्लीच्या परिसरातील कारखान्यांमधून रसायनयुक्त पाणी थेट यमुनेत सोडले जाते. या सर्वांना कठोर उपाय योजना करून अटकाव करण्यात येईल. दिल्ली सरकार ठिकठिकाणी मैलापाणी आणि सांडपाणी शुद्धीकरण संयंत्रे बसवणार आहे. औद्योगिक कचरा जो यमुनेत थेट मिसळला जातो त्यावरील कारवाई केवळ कागदावरच रहातो, असा अनुभव आहे. मात्र राज्य सरकारतर्फे आता या कारखान्यांना औद्योगिक कचरा व रासायनिक पाणी जमा करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी व्यवस्था करण्यात आहे. त्या व्यतिरिक्त जे कारखाने यमुनेत कचरा टाकतील, त्यांच्यावर थेट बंदी घालण्याची कठोर कारवाई केली जाईल.

दिल्लीतील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढवण्यात येईल आणि नवे प्रकल्पही सुरू केले जातील. ज्या नाल्यांमधून यमुनेत गलिच्छ पाणी मिसळते त्या नाल्यांची सफाईसाठी संयंत्रे बसवली जातील. पूर्व दिल्लीच्या भागामध्ये अशी संयंत्रे तयार आहेत. मात्र त्यांना सांडपाणी वाहिन्या जोडण्याची कारवाई केलेली नाही. फेब्रुवारी २०२५ पर्यंत यमुना स्वच्छ झालेली असेल अशी आशा सरकारला आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.

भाजपकडून जुने व्हिडिओ शेअर

भाजपने केजरीवाल यांचे जुने व्हिडिओ शेअर करून, मुख्यमंत्री त्यात यमुना सफाईची घोषणा पुन्हा पुन्हा करत असल्याचे टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारने दिल्ली सरकारला सांडपाणी आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी २ हजार ४०९ कोटी रुपये दिले होते. ते कोठे गेले, असा गंभीर सवाल भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी उपस्थित केला. गुप्ता म्हणाले, की केजरीवाल यांनी यापूर्वी अशाच पद्धतीने यमुना स्वच्छ करण्याची घोषणा २०१३, २०१४, २०१५, २०१७, २०१९ व २०२० मध्ये केली होती. त्या सर्व घोषणा हवेत विरल्या असून आता पुन्हा नवी 'टाइमलाइन' केजरीवाल यांनी देणे हास्यास्पद आहे. एकच गोष्ट वारंवार सांगितल्याबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन, असा टोलाही गुप्ता यांनी लगावला आहे.

"मी जे बोलतो ते करतो. यमुना नदी इतकी अस्वच्छ झाली आहे की स्वच्छता एका दिवसात होणार नाही. त्यासाठी वेळ लागेल. मात्र २०२५ पर्यंत यमुना स्वच्छ झालेली दिसेल. मागील निवडणुकीत ‘आप’ने पुढील निवडणुकीपर्यंत यमुना स्वच्छ होईल हेच आश्वासन दिले होते."

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

loading image
go to top