जया जेटली यांच्या शिक्षेला स्थगिती 

पीटीआय
Friday, 31 July 2020

न्यायधीश सुरेश कुमार कैत यांनी शिक्षेलाआव्हान देणाऱ्या जया जेटली यांच्या याचिकेवर सीबीआयकडून उत्तर मागितले आहे.न्यायालयात जया जेटली यांची बाजू ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी,पी. पी. मल्होत्रा यांनी मांडली

नवी दिल्ली - भ्रष्टाचारप्रकरणी समता पक्षाच्या माजी अध्यक्षा जया जेटली यांना आज सकाळी सीबीआय न्यायालयाने चार वर्षाच्या कैदेची सुनावली, मात्र सायंकाळी या शिक्षेला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. 

न्यायधीश सुरेश कुमार कैत यांनी शिक्षेला आव्हान देणाऱ्या जया जेटली यांच्या याचिकेवर सीबीआयकडून उत्तर मागितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात जया जेटली यांची बाजू ज्येष्ठ वकिल मुकुल रोहतगी, पी. पी. मल्होत्रा यांनी मांडली. या वेळी भ्रष्टाचारप्रकरणी जेटली यांना शिक्षा देणाऱ्या २१ तारखेच्या निर्णयाला आव्हान दिले. तत्पूर्वी २००१ च्या स्टिंग ऑपरेशमध्ये लाच घेतल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने जया जेटली (वय ७८) आणि त्यांच्या पक्षाचे तत्कालिन सहकारी गोपाल पचेरलवाल तसेच निवृत्त मेजर जनरल एस. पी. मुरगई यांना प्रत्येकी चार-चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच न्यायालयाने तिघांवर प्रत्येकी एक-एक लाखांचा दंडही ठोठावला होता. दोषींन सायंकाळी पाचपर्यंत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

‘ऑपरेशन वेस्ट एंड’ 
न्यूज पोर्टल ‘तहलका’ने जानेवारी २००१ रोजी ऑपरेशन वेस्टएंड नावाचे स्टिंग ऑपरेशन केले होते. यात बनावट नावाने कंपनी तयार करुन लष्करासाठी वापरण्यात येणाऱ्या थर्मल इमेजर्सची ऑर्डर देण्यासाठी लाच घेताना दाखवण्यात आले होते. स्टिंग ऑपरेशनमध्ये तत्कालिन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिसच्या अधिकृत निवासस्थानावर बनावट नावाने कंपनीचे प्रतिनिधी पाठवण्यात आला. त्यावेळी जया जेटली यांनी प्रतिनिधी मॅथ्यू सॅम्यूअलकडून २ लाखांची लाच घेतली. त्याचवेळी मुरगई यांनी २० हजाराची लाच घेतली. अन्य आरोपी सुरेंद्रकुमार हे माफीचे साक्षीदार बनले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संरक्षण मंत्री फर्नांडिस यांना तत्कालिन अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले. या प्रकरणात तत्कालिन भाजपचे अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांचेही नाव आले होते. परंतु त्यांना नंतर क्लिन चिट देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi high court suspend sentence to jaya jaitley