दिल्लीत सातपासून आंतरराष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

चित्रकलेचे खास दालनही यंदापासून या प्रदर्शनात असेल त्यात मारियो मिरांडा, रवी परांजपे, जगदीश जोशी, भिक्की पटेल, पुलक विश्‍वास आदी नामवंत चित्रकारांच्या निवडक चित्रकृती ठेवण्यात येतील. "मानुषी' या संकल्पनेअंतर्गत विख्यात भारतीय लेखिकांच्या पुस्तकांचेही दालन यात असेल. याशिवाय लेखिकांच्या कामगिरीवर आधारित काव्यवाचन, कथाकथन व परिसंवादही यावेळी होणार आहे.

नवी दिल्ली - देशविदेशांतील ग्रंथप्रेमी व पुस्तक प्रकाशकांचा महाकुंभमेळा मानले जाणारे दिल्ली आंतरराष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शन येत्या सात ते 15 जानेवारपर्यंत प्रगती मैदानावर भरणार आहे. स्त्रीविषयक साहित्याला वाहिलेल्या जगभरातील उत्तमोत्तम पुस्तकांचा खजिना यानिमित्ताने खुला होणार असून, यंदाच्या या वर्षीच्या प्रदर्शनाची संकल्पनाही "मानुषी' (महिला साहित्यिकांचा गौरव) अशी आहे. यात मराठीसह भारतीय भाषांतील 800 प्रकाशने यंदा सहभागी होणार आहेत. नॅशनल बुक ट्रस्टचे (एनबीटी) उपसंचालक कुमार अखिलेश यांनी आज ही माहिती दिली.

केंद्रीय मुष्यबळ विकास राज्यमंत्री महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते सात जानेवारीला हंसध्वनी सभागृहात या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. या वेळी ज्ञानपीठ विजेत्या लेखकांचाही गौरव केला जाईल. प्रख्यात ओडिया लेखिका डॉ. प्रतिभा राय आणि युरोपीय महासंघाचे राजदूत टोमाश कोजलोस्की प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी हजर राहतील. केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दहा जानेवारीला भेट देण्याचे मान्य केल्याचे सांगण्यात आले.

दिल्लीत दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शन भरते. एक ऑगस्ट 1957 रोजी तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी "एनबीटी'चे उद्‌घाटन केले. यंदा ही संस्था साठाव्या वर्षात पदार्पण करत असून, त्यानिमित्त संस्थेच्या सहा दशकांच्या वाटचालीचे सिंहावलोकन करणारे एक विशेष चित्रप्रदर्शन यंदाच्या प्रदर्शनाचे वेगळे आकर्षण असेल. याशिवाय "एनबीटी'ने प्रकाशित केलेल्या व सर्वाधिक विक्रीचे मानदंड प्रस्थापित करणऱ्या पुस्तकांचेही खास दालन यात असेल. यात 2001-1026 या काळात पाच लाख तीन हजारांपेक्षा जास्त प्रती विकली गेलेली इंग्रजीसह भारतीय भाषांतील 300 पुस्तके असतील. चित्रकलेचे खास दालनही यंदापासून या प्रदर्शनात असेल त्यात मारियो मिरांडा, रवी परांजपे, जगदीश जोशी, भिक्की पटेल, पुलक विश्‍वास आदी नामवंत चित्रकारांच्या निवडक चित्रकृती ठेवण्यात येतील. "मानुषी' या संकल्पनेअंतर्गत विख्यात भारतीय लेखिकांच्या पुस्तकांचेही दालन यात असेल. याशिवाय लेखिकांच्या कामगिरीवर आधारित काव्यवाचन, कथाकथन व परिसंवादही यावेळी होणार आहे.

वीस देशांतील प्रकाशक
या वर्षीच्या दिल्ली ग्रंथ प्रदर्शनात 20 देशांतील प्रकाशक सहभागी होतील. यात चीन, रशिया, फ्रान्स, जर्मनी, इराण, नेपाळ, पोलंड, जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को आदींचा समावेश आहे. "न्यू होमलॅंड्‌स' या दालनात भारतातील युरोपीय महासंघाच्या प्रतिनिधींद्वारे छायाचित्र प्रदर्शन भरविले जाईल. लेखक मंच व सीईओ स्पीक या दालनांमध्ये रोज संध्याकाळी लेखक-प्रकाशकांशी थेट भेटीचा योग जुळून येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi to host international book fair