‘जेएनयू’मध्ये राडा; विद्यार्थ्यांनी अडविली रुग्णवाहिका

टीम ई-सकाळ
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

जेएनयू'मध्ये आज वसतिगृह प्रशासनाच्या समितीची बैठक सुरु असताना या बैठकीमध्ये काही विद्यार्थी बळजबरी घुसले.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) काही विद्यार्थ्यांनी उच्च रक्तदाबामुळे अस्वस्थ झालेल्या एका प्राध्यापकाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेचा रस्ता अडविला. यामुळे संतप्त झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला.

महाराष्ट्रात कोणीही दुष्यंत नाही : संजय राऊत

जेएनयू'मध्ये आज वसतिगृह प्रशासनाच्या समितीची बैठक सुरु असताना या बैठकीमध्ये काही विद्यार्थी बळजबरी घुसले. या वेळी समितीच्या सदस्यांनी त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र, अधिक आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात घोषणा देत डीन ऑफ स्टुडंट्‌स या पदावरील प्राचार्य उमेश कदम यांच्या दिशेने जाण्यास सुरवात केली. या तणावाच्या वातावरणाचा परिणाम होऊन कदम यांचा रक्तदाब वाढला आणि ते अस्वस्थ झाले. त्यामुळे तातडीने रुग्णवाहिकेला बोलाविण्यात आले. मात्र या विद्यार्थ्यांनी असंवेदनशीलतेने रुग्णवाहिकेलाही विद्यापीठाबाहेर अडवून ठेवले. एवढेच नाही, तर

विद्यापीठातील डॉक्‍टरांनाही कदम यांच्यावर उपचार करू दिले नाहीत. कदम यांच्या पत्नी आणि मुलांच्या विनंतीकडेही त्यांनी दुर्लक्ष केले. बऱ्याच प्रयत्नांनी कदम यांनी रुग्णवाहिकेत ठेवल्यावरही विद्यार्थ्यांनी घेराव घालत रस्ता अडवून ठेवला आणि रुग्णवाहिकेला विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राच्या दिशेने नेले. सध्या कदम यांच्यावर येथेच उपचार सुरू आहेत.

अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असा कोणताही वाद नाही : फडणवीस

या घटनेचा "जेएनयू'चे कुलगुरू एम. जगदेशकुमार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आणि या विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. "जेएनयू'च्या विद्यार्थी संघटनेने मात्र आंदोलनाचे समर्थन केले आहे. जेएनयूमध्ये अनेक गरीब विद्यार्थी शिकण्यास येत असताना त्यांची अडवणूक करण्यासाठी वसतिगृहाचे शुल्क वाढविण्याचा घाट आजच्या बैठकीत घातला जात होता, त्या विरोधात आमचे शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू होते, असा दावा संघटनेने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi jnu students block ambulance during protest