
Delhi Girl Accident : हॉटेलमध्ये मैत्रिणीसोबत अंजलीचं भांडण का झालं? तपासात कारण आलं समोर
नवी दिल्लीः १ जानेवारी रोजी पहाटे दिल्लीच्या हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. त्यामुळे सबंध देश हळहळला असून या प्रकरणामध्ये सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या दिवशी अंजलीचं मैत्रिणीसोबत भांडण झालं होतं. परंतु त्याचं कारण माहिती नव्हतं. आज तोही खुलासा झालेला आहे.
१ जानेवारीच्या पहाटे २ ते ५ या दरम्यान नेमकं काय झालं? असा प्रश्न सबंध देशाला सध्या पडला आहे. कारण एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किलोमीटर पीडितेला फरफटत नेलं होतं. पोलिसांना जेव्हा तिचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शरीरावरील मांस खरवडून गेलं होत.
दिल्लीतल्या सुलतानपुरी कंझावला घटनेचा व्हीडिओ समोल आलेला होता. व्हीडिओ दिल्ली पोलिसांचा महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. या व्हीडिओमध्ये मृत अंजली आणि तिच्या मैत्रिणीमध्ये भांडण सुरु असल्याचं दिसून येतंय. हॉटेलबाहेरचं हे सीसीटीव्हा फुटेज होतं.
दोघींचं भांडण हॉटेलमध्ये सुरु होतं, परंतु इतरांनी तक्रार केल्याने त्यांना हॉटेल स्टाफने बाहेर काढलं. दोघी स्कुटीवर एकत्र गेल्या असल्या तरी गाडीवर बसण्यापूर्वी त्यांचं भांडण झालं.
हेही वाचा: Delhi Accident cctv : घटनेपूर्वी अंजलीचं मैत्रिणीसोबत कडाक्याचं भांडण, त्यांना हॉटेलमधून बाहेर काढलं...
त्या दिवशी नेमकं भांडण कशावरुन झालं, त्याची माहिती आज समोर आली आहे. मृत तरुणीचा एक मित्र त्या दिवशी हॉटेलमध्ये होता. त्याने दावा केला आहे की, अंजली आणि निधी यांच्यामध्ये पैशांवरुन भांडण झालं होतं.
'त्या' रात्री नेमकं काय झालं?
अंजलीच्या त्या मित्राने सांगितलं की, त्या दिवशी अंजलीने मला फोन करुन हॉटेलमध्ये बोलावलं होतं. मी गेलो नाही तर एका मुलाला पाठवून मला बोलावलं. तिथे गेल्यानंतर अंजली आणि निधी बिअर पित होत्या. त्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण सुरु झालं. ते भांडण पैश्यावरुन होतं. निधी अंजलीकडे आपले पैसे मागत होती. त्यांच्यात धक्काबुक्कीही झाली. त्यानंतर रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान अंजली निघून गेली.