esakal | दिल्लीत परिस्थिती हाताबाहेर; लॉकडाऊन पुन्हा वाढवला

बोलून बातमी शोधा

दिल्लीत परिस्थिती हाताबाहेर; लॉकडाऊन पुन्हा वाढवला

केजरीवाल यांनी कोरोनाशी लढण्यात काही ठिकाणी अपयश आल्याचं मान्य केलं. मात्र बहुतांश ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा यशस्वीपणे केला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दिल्लीत परिस्थिती हाताबाहेर; लॉकडाऊन पुन्हा वाढवला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - दिल्लीत कोरोनाचा कहर वाढत असून याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढवण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं सांगितलं. पत्रकार परिषद घेत केजरीवाल यांनी दिल्लीत पुढच्या सोमवारपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्याची माहिती दिली. गेल्या आठवड्यात दिल्लीत लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर आता त्यात वाढ करून 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, अद्याप कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. जनतेचंही लॉकडाऊन करण्याच्या बाजुने मत आहे. यामुळेच आणखी आठवडाभर हे निर्बंध कायम राहतील. सध्या पॉझिटिव्हिटी रेट हा 36 ते 37 टक्के इतका आहे. तो आधी एवढा नव्हता. दिल्लीला मिळणारा ऑक्सिजनचा कोटा 480 मेट्रिक टनांवरून 490 मेट्रिक टन इतका झाला आहे. मात्र दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. तर आता 330 ते 335 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत आहे.

केजरीवाल यांनी कोरोनाशी लढण्यात काही ठिकाणी अपयश आल्याचं मान्य केलं. मात्र बहुतांश ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा यशस्वीपणे केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऑक्सिजनचं व्यवस्थापन सुरु करत असून त्यासाठी एक पोर्टल तयार करण्यात आलं आहे. यासाठी दर दोन तासाला मॅन्युफॅक्चररपासून रुग्णालयापर्यंत सर्वांना त्यांच्याकडील ऑक्सिजनची माहिती अपडेट करावी लागेल. रुग्णालयांनी किती ऑक्सिजन वापरला आणि पुरवठा करणाऱ्यांनी किती पुरवला हे सांगावं लागेल. यामुळे सरकारला ऑक्सिजन कुठे कमी पडेल, कुठे उपलब्ध आहेल याची माहिती मिळेल.

हेही वाचा: १ मे पासून कोविन पोर्टल, आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतरच मिळणार लस

कोरोनाच्या या संकटाला तोंड देताना केंद्राकडून पूर्णपणे सहकार्य मिळत असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं. या कठीण परिस्थितीत सर्वजण मिळून काम करत आहे. आशा आहे की काही दिवसात हे गोंधळाचं वातावऱण ठीक होईल. केंद्र सरकारशिवाय इतर ठिकाणाहून काही मदत मिळेल का यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं केजरीवाल म्हणाले. देशात सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे की, तुमच्याकडे जर अतिरिक्त ऑक्सिजन असेल तर सांगा. त्याबाबत काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर नक्कीच तुम्हाला सांगेन असंही केजरीवाल म्हणाले.