दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडुत लॉकडाऊन वाढणार? राज्य सरकारकने दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडुमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. एकट्या महाराष्ट्रात देशातील 40 टक्के रुग्ण आहेत. 

नवी दिल्ली, ता. 12 : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशात वाढत चालला आहे. त्यामुळे अजुनही लोकांच्या मनात लॉकडाऊनबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. देशात महाराष्ट्र, तामिळनाडु आणि दिल्लीत रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. यामुळे या राज्यांमध्ये लॉकडाऊन 15 जूनपासून पुन्हा कडक केले जाणार अशी चर्चा केली जात आहे. मात्र असं काही होणार नसून संबंधित राज्यांच्या सरकारकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगितलं आहे. 

उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटलं की, लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या. असं आवाहनही त्यांनी राज्यातील जनतेला केलं आहे. आदित्य ठाकरे यांनीही लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊनबाबत चुकीच्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका. महाराष्ट्रात सध्या नवीन सुरुवात होत आहे. उद्धव ठाकरे यांनी सर्वांना आवाहन केलंय की सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा ज्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवणार नाही. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशातील एकूण रुग्णांच्या 40 टक्के रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. यामुळे लॉकडाऊनच्या अफवेवर लोकांचा विश्वास बसत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्ली आणि तामिळनाडुतही अशा अफवा पसरत आहेत. 

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीही लॉकडाऊनची फक्त अफवा असल्याचं सांगितलं. तामिळनाडुच्या राज्य सरकारनेही अशा प्रकारचा कोणताच निर्णय घेतला नसल्याची माहिती दिली आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडुमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाऊन वाढेल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र सध्या तरी अशा प्रकारचा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Maharashtra and tamilnadu rumors over lock down extension