विद्यार्थ्यांवर कारवाई करणारा तरुण; ABVP, RSSचा नाहीच! पोलिसांचाही खुलासा

टीम ई-सकाळ
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर कारवाई केली. पोलिसांनी विद्यापीठातील कारवाईमध्ये हवेत गोळीबार केला, तसेच अश्रू धूरांच्या नळ कांड्याही फोडल्या.

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया इस्लामिया मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. त्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर कारवाई करणारा एक तरुण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत होती. पण, संबंधित तरुण, संघाचा किंवा विद्यार्थी परिषदेचा नसल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो तरुण अँटी-ऑटो थेफ्ट स्कॉडचा (एएटीएस) आहे. त्यामुळं सोशल मीडियावर उठलेल्या वादळावर पडदा पडलाय. या संदर्भात द प्रिंट या वेब पोर्टलनेही वृत्त प्रसिद्ध केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले?
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आणि दिल्ली पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. पोलिसांनी विद्यापीठातील कारवाईमध्ये हवेत गोळीबार केला, तसेच अश्रू धूरांच्या नळ कांड्याही फोडल्या. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करत अलीगढ आणि इतर विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले. दिल्लीत या आंदोलनाची तीव्रता अधिक होती. या सर्व प्रकरणात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्तेसुद्धा दिल्ली विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात आला. जामिया विद्यापीठातील तरुणांवर काठी उगारणारा तो लाल कपड्यांमधील तरुण हा अभविपचा कार्यकर्ता भारत शर्मा असल्याचे ट्विटरवरून व्हायरल झाले. भारत शर्मा याच्या फेसबूक प्रोफाईलवर त्याने अभविपचा कमिटी मेंबर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असे लिहले आहे. ती माहिती आणि दिल्ली विद्यापीठात विद्यार्थ्यांवर कारवाई  करणारा कॉन्सटेबल, यांचे फोटो एकत्र करून ते सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले. त्याच्या हा व्हिडिओसुद्धा आता प्रचंड व्हायरल झाला आहे.

पोलिस साध्या वेशात कसे?
दिल्लीतील पोलिस कारवाईच्या वेळेस पोलिस साध्या वेशात कसे? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. यामुळे पोलिसही अडचणीत आले आहे. याबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने पोलिस साध्या वेशात कामावर येऊ शकत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केलाय. दी प्रिंट या वेबपोर्टलने ही प्रतिक्रिया प्रसिद्ध केलीय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi police clarifies man beating jamia students not rss volunteer but aats constable