DelhiRiot: नातेवाईकांच्या चौकशीसाठी गेले; दोघा भावांचे ड्रेनेजमध्ये आढळले मृतदेह

Delhi Riot gokulpura two brothers dead bodies got in drainage
Delhi Riot gokulpura two brothers dead bodies got in drainage

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचाराचा वणवा शांत झाल्यानंतर आता ठिकाठिकाणच्या मानवी क्रौर्याच्या धक्कादायक कथा समोर येऊ लागल्या आहेत. ईशान्य दिल्लीतील शाळांनाही दंगलीची झळ पोहोचली आहे. तर, दंगलग्रस्त गोकळपुरी भागातील दोघा भावांची स्टोरी वेदना देणारी आहे. दोघांचे मृतदेह ड्रेनेजमध्ये आढळले आहेत.

हिंसाचाराचे केंद्रबिंदू असलेल्या ईशान्य दिल्लीतील शिवविहार भागामध्ये दंगलखोरांनी दोरखंडाच्या साहाय्याने शाळेच्या इमारतीवरून चढून आतील सामानाची नासधूस केल्याचा प्रकार उघड झाला आहे. शाळेतील लाकडी बाकांची नासधूस करतानाच दंगलखोरांनी शैक्षणिक साहित्यही जाळून टाकले. या शाळेमध्ये एक हजार मुले शिकत होती, असे या संस्थेचे प्रशासकीय प्रमुख धर्मेश शर्मा यांनी सांगितले. दंगलखोरांनी शाळेला आग लावल्यानंतर तब्बल चोवीस तास ती धुमसत होती, अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही ते वेळेत आलेच नाहीत, अशी खंत स्थानिकांनी माध्यमांशी बोलून दाखविली. दंगलखोरांनी या शाळेतील दोन कर्मचाऱ्यांना खोल्यामध्येच कोंडले होते, सुदैवाने पोलिसांनी वेळीच त्यांची सुटका केल्याने त्यांचे प्राण वाचू शकले.

वृद्धेचा गुदमरून मृत्यू 
दिल्लीतील हिंसाचाराची मोठी झळ वृद्धांनाही बसली. येथील ८५ वर्षीय अकबरी या वृद्धेचा जमावाने तिच्या घरास आग लावल्याने गुदमरून मृत्यू झाला. दिल्लीतील खजुरी खास भागाजवळील गामरी खेड्यामध्ये तिचे घर होते. जमावाच्या हल्ल्याबाबत माहिती देताना त्यांचा मुलगा सलमानी म्हणाला की, मी मंगळवारी सकाळीच दूध आणायला गेलो होतो, या वेळी घरी परतत असताना माझ्या मुलाने फोन करून मला सांगितले की, एका जमावाने आपल्या घराला घेरले आहे. या वेळी जमावाच्या हातामध्ये बाँब आणि काठ्या होत्या. या वेळी मी सर्वांना तातडीने घराच्या टेरेसवर जाण्यास सांगितले. जमावाने इमारतीचा खालचा मजला आणि गोडाऊनला आग लावली तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर पेट्रोल बाँब फेकले. या वेळी अकबरी या खालच्याच घरात अडकून पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. 

ते दोन भाऊ परतलेच नाहीत 
दंगलग्रस्त गोकळपुरी भागात स्वत:च्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यास गेलेल्या दोघा भावांना जमावाच्या मारहाणीमध्ये प्राण गमवावे लागले. महंमद आमीर आणि हाशीम अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. गोकळपुरी परिसरामध्ये दंगल भडकल्यानंतर या दोघांनीही गाझियाबादेतून त्यांच्या कुटुंबीयांच्या दिशेने धाव घेतली होती. दुसऱ्या दिवशी या दोघांचेही मृतदेह ड्रेनेजमध्ये आढळून आले. दरम्यान याच भागामध्ये मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी माथेफिरू जमावाने दुकानांनाही आगी लावल्या होत्या, यामध्ये काही हिंदूंची घरेही जळून खाक झाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. गोकळपुरी भागातील भागिरथी विहार येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. विशेष म्हणजे अनेक भागांमध्ये दंगलखोरांनी महिलांची छेड काढल्याची धक्कादायक बाबही उघडकीस आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com