पुणे : ते म्हणाले, 'आवाज वाढव डीजे' अन् मग बाउन्सरने...

DJ-Sound-System
DJ-Sound-System

पुणे : हॉटेलमध्ये पार्टीसाठी जमलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ध्वनीवर्धकावर गाणे लावण्यास सांगितल्याच्या कारणावरुन हॉटेलमधील बाऊन्सरने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. ही घटना पाषाण भागातील एका हॉटेलमध्ये गुरूवारी (ता.२७) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. 

याप्रकरणी प्रतीक उत्तम कदम (वय 20, रा. चाणक्‍य क्‍लासजवळ, गोखलेनगर) याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन योगेश मानकर, वरुण पाटील, रोहन निम्हण यांच्यासह दहा ते बारा बाऊन्सरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कदम हा एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी गुरूवारी रात्री पाष्ण येथील हॉटेल ठिकाणा येथे फेअरवेल पार्टीचे आयोजन केले होते. त्यानुसार, सर्व विद्यार्थी गुरूवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास संबंधित हॉटेलमध्ये जमले. पार्टीसाठी कदम, त्याचे मित्र स्वप्नील शिंगारे, स्वप्नील गव्हाणे, शुभम क्षीरसागर, राहुल होळकर, यश बनसोडे, विनय भुवड हेही पोचले. रात्री पावणे बारा वाजता हॉटेलमधील ध्वनिवर्धक बंद करण्यात आले. मात्र पार्टीसाठी जमलेल्या विद्यार्थ्यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना ध्वनिवर्धकावर गाणी लावण्यास सांगितले. त्यामुळे विद्यार्थी व हॉटेलमधील कर्मचारी यांच्यात वाद झाला.

त्यानंतर कदम, शिंगारे, गव्हाणे, होळकर, बनसोडे, भुवड हॉटेलमधून बाहेर पडले. त्यावेळी मानकर, पाटील, निम्हण तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या दहा ते बारा बाऊन्सरने विद्यार्थ्यांना लोखंडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी दाखल परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाऊन्सरकडून ग्राहक 'टार्गेट'

सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकीत हॉटेलमध्येही बाऊन्सरने तरुणी आणि तिच्या मित्राला मारहाण करत तरुणीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा हॉटेलमधील बाऊन्सरकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रकार पुढे आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com